पुण्यातील जगदंबा हॉटेलमध्ये एकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. अचानक झालेल्या गोळीबाराने सगळीकडे खळबळ उडाली. दरम्यान गोळीबार कोणी केला, हे अद्याप समजू शकले नसून हा गोळीबार पूर्व वैमानसातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव अविनाश धनवे असल्याचे सांगितले जात आहे.
ही घटना इंदापूरच्या बायपासवरील जगदंबा हॉटेलमध्ये घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अविनाश धनवे हा त्याच्या मित्रांसह जगदंबा हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेला असताना दबा धरून बसलेल्या पाच ते सहा जणांनी त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये त्याच्या डोक्यातही गोळी लागली. त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
हत्येच्या घटनेचे जे प्रकारचे व्हिडिओ समोर येत आहेत, ते पाहता हे आरोपी पूर्ण नियोजन करून आले होते. त्यांनी मोठ्या चपळाईने हा खून केला. अवघ्या 27 सेकंदात त्याने हॉटेलमध्ये घुसून तरुणाची हत्या केली आणि पळ काढला. शनिवारी रात्री घडलेल्या या खुनाच्या घटनेने खळबळ उडाली आहे.