तरुण भारत लाईव्ह । १० एप्रिल २०२३। अकोला मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील पारस येथील बाबूजी महाराज रविवारी मंदीरात आरती सुरू असतानाच मंदिराच्या शेडवर झाड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ३५ जण जखमी झाले आहेत. जखमींवर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील पारस येथील बूजी महाराज मंदिरात रविवारी रात्री आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. दररोज होणाऱ्या या आरतीला ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावतात. आरती सुरू असतानाच वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे मंदिराबाहेर आरतीसाठी उभे असलेले भाविक मंदिरात आले. सर्वजण मंदिरात दाटीवाटीने उभे राहून आरती करत होते. बाहेर पाऊस सुरू होता. मात्र सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक वर्ष जुनं लिंबाचं झाड सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेडवर कोसळलं. आणि मोठी दुर्घना घडली. या दुर्घटनेत ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ३५ जण जखमी झाले आहेत. जखमींवर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान सरकारकडून जखमी तसेच मृतांना आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली. “जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली असून जखमींवर वेळेत उपचार व्हावेत यासाठी ते समन्वय ठेवून आहेत.
आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात आहोत. काही जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून किरकोळ जखमींवर बाळापूर येथे उपचार करण्यात येत आहेत. तर मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकार तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी यांनी घेतला आहे असेही त्यांनी सांगितले.” अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे.