तेजोमय किरणांना सूर्य नमस्काराने नमन करीत ७०० विद्यार्थ्यांनी केले नवीन वर्षाचे स्वागत !

वैभव करवंदकर
नंदुरबार :
सूर्य तेजाची शक्ती आणि ऊर्जा घेऊन अखंड वर्षभर चैतन्याने विविध आव्हानांना लिलया पेलता येण्याचा संकल्पम्हणून नव वर्षारंभाला सूर्यनमस्कार घालून सुर्यकिरणांना अभिवादन करण्याचा उपक्रम येथील हि. गो. श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी राबवला. या प्रेरणादायी शालेय उपक्रमाला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, संस्थेचे चेअरमन ॲड. रमणलाल शाह, सचिव डॉ.योगेश देसाई, मुख्याध्यापक सुषमा शाह, मनीष शाह, माजी मुख्याध्यापक पूनम गिरी, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षक विद्या सिसोदिया, जगदीश पाटील, मीनाक्षी भदाणे आदी  उपस्थित होते.

७०० विद्यार्थ्यांनी शालेय मैदानावर सूर्यनमस्कार घालून पृथ्वीवर येणाऱ्या सूर्यकिरणांना प्रणाम केले. शाळेच्या मुख्याध्यापक सुषमा शाह यांनी, संयम व जिद्दीने सुर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा संकल्प वर्षारंभाला निरंतर पणे करतो आहोत. सूर्यनमस्कार विद्यार्थी जीवनाचा अभिन्न भाग व्हावा म्हणून प्रेरणा देणारा हा उपक्रम असल्याचे प्रस्ताविकेतून सांगीतले. कार्यकमाचे प्रमुख अतिथी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी भारतीय योग विद्येला जगाने स्वीकारले आहे. शारीरिक मानसिक विकास, चित्त एकाग्रता, विविध ग्रंथी सक्रिय होण्यासाठी सूर्यनमस्कार आवश्यक आहे. हा स्तुत्य उपक्रम श्राॅफ हायस्कूलने राबवून प्रेरणादायी कार्य निरंतर सुरू ठेवल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. या भव्य कार्यक्रमासाठी मैदान व सुर्यस्तंभ आरेखन हेमंत पाटील, शिवाजी माळी ,फलक सजावट महेंद्र सोमवंशी यांनी केले. संगीत संयोजन अनघा जोशी, संस्कृत सूर्य श्लोक योगेश शास्त्री यांनी गायले. ओमकार पठण जगदीश वंजारी तर उद्घघोष भिकू त्रिवेदी यांनी केला. हेमंत पाटील यांनी बासरी वरील संगीताची साथ दिली.

सूत्रसंचालन चेतना पाटील तर आभार उपमुख्याध्यापक राजेश शाह यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षक विद्या सिसोदिया, जगदीश पाटील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर सहकार्‍यांनी परिश्रम घेतले.