---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यात तीन मोठ्या प्रकल्प पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला आहे. त्यात सर्वांत मोठ्या हतनूर प्रकल्पात गेल्या २४ तासांत ४२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, प्रकल्पाचे २४ दरवाजे उघडून ७३ हजार ७ क्यूसेकचा विसर्ग केला जात आहे. प्रकल्प पाणलोट क्षेत्रात आवकेत वाढ होत असून, त्यानुसार विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्रात पशुधन घेऊन जाऊ नये, असा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
जिल्ह्यात हतनूर, गिरणा आणि वाघूर असे तीन मोठे, १४ मध्यम व ९६ लघु प्रकल्प असून, सर्वच प्रकल्पांत पाण्याची आवक कमी अधिक प्रमाणात होत आहे. जिल्ह्यात तापी व पूर्णा नदी पाणलोट क्षेत्रात दमदार पावसामुळे हतनूर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत तब्बल १३०.७७ दशलक्ष घनमीटर अर्थात ४.६२ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.
जोरदार पावसाची शक्यता
भुसावळ विभागात २१ ऑगस्टपर्यंत पावसाची स्थिती आहे. या कालावधीत काही ठिकाणी हलक्या ते मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. २२ ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरेल. मात्र, अधूनमधून हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी वर्तवला आहे.