बिबट्याचे हल्ले सुरूच, तळोद्यामध्ये पुन्हा दोन वर्षीय चिमुरडी ठार

नंदुरबार : तळोदा तालुक्यात सातत्याने बिबट्याच्या दर्शनासह हल्ल्याच्या घटना समोर येत आहे. महिनाभरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा बळी गेला असून, पुन्हा एकदा बिबट हल्ल्याची घटना समोर आली आहे. रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास रोझवा प्लॉट (पुर्नरवसित, ता. तळोदा) येथे २ वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला केला.  या हल्ल्यात अनुष्का जलसिंग पाडवी (२) ही बालिका ठार झाली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, वन विभागावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहेत.

तळोदा तालुक्यात बिबट्याचा अधिवास असल्याचे वेळोवेळी अधोरेखित होत आहे. महिनाभरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा बळी गेला होता. त्यामुळे वनविभागाने पिंजरे लावून रेस्क्यू करत तीन बिबट्यांना जेरबंद केले होते. मात्र तरीदेखील रात्री अपरात्री दिवसा कधीही बिबट्या नजरेस पडत असल्याने तालुक्यात बिबट्याचे दर्शन नित्याचे झाले आहे.

डनेल (ता.अक्कलकुवा) येथील सरदार सरोवर बुडीत क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त सिमजी नानाजी पाडवी या कुंटुबाला दलेलपुर (रोझवा प्लाट, पुर्नरवसित, ता. तळोदा) शिवारात शेत जमिन देण्यात आली आहे. या शेतात घर करून जलसिंग सिमजी पाडवी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत.

रविवारी सकाळी ६.३० वाजेदरम्यान आईसमवेत अनुष्का ही बालिका शौचास बसली. दरम्यान, ऊसाचा शेतात दबाधरून बसलेल्या बिबट्याने अचानकपणे बालिकेवर झडप घातली. यात अनुष्का ही गंभीर जखमी झाली.

तिला तातडीने प्राथमिक उपचारार्थ तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

दुसरीकडे, एवढी गंभीर घटना घडली असताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मात्र गांभीर्य नसल्याचे समोर आले आहे. कारण सकाळी घडलेल्या घटनास्थळी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी दुपारी १२.३० पर्यंत पोहचले नव्हते. केवळ वनपाल वासुदेव माळी, वाहन चालक व वनविभागाचे वाहन होते.

तळोदा तालुक्यात महिन्याभरात बिबट्याने चौथा बळी घेतला असून, या घटनांमुळे स्थानिक नागरीकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. मात्र वनविभाग कार्यालयात बसून बिबट्यांच्या बंदोबस्त करीत असल्याचे चित्र सध्याच्या घटनांवरून दिसून येत आहे.  तर बिबटे वनविभाग अधिकाऱ्यांना एक प्रकारे शहर व परिसरात आपला मुक्तसंचार करून एक प्रकारचे आव्हान देत असल्याचे दिसून येत आहे.