---Advertisement---
अमळनेर : तालुक्यातील ८१ जणांना पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या प्रस्तावानुसार अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांनी दि. २२ सप्टेंबर ते दि. ३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीसाठी अमळनेर तालुक्यातून हद्दपार केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारी वाढत असल्याने पोलिस निरीक्षक निकम यांनी विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या अशा ८३ जणांचा नवरात्र व सणाच्या काळात हद्दपारीचा प्रस्ताव भारतीय न्यायसंहिता कलम १६३(२) प्रमाणे डीवायएसपी विनायक कोते यांच्यामार्फत अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांच्याकडे पाठविला होता.
यावर नेरकर यांनी ८३ पैकी ८१ जणांना २२ रोजी मध्यरात्रीपासून ते ३ ऑक्टोबरपर्यंत तालुक्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश संबंधितांना पोलिस कर्मचाऱ्यांमार्फत बजावण्यात आले आहेत.
मोकाट गुरांचा धोका
अमळनेर : शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा, चौक व वसाहती भागात मोकाट गुरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांचा त्रास वाढत आहे.
शाळा, कॉलेज परिसरातही ही जनावरे मुक्तपणे फिरत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी गुरांमुळे मोटारसायकलस्वारांचे अपघातही घडल्याची उदाहरणे आहेत. पालिकेने यावर तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अन्यथा वाहतुकीच्या दृष्टीने गंभीर परिणाम होऊ शकतात.