---Advertisement---
जळगाव : निम्म्या जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा प्रकल्पाची पातळी ८५ टक्क्यांपर्यंत पोहोचली असून, गेल्या २४ तासांत गिरणा नदी व प्रकल्प पाणलोट क्षेत्रात १५ मिलिमीटर पावसाने. १२.०१ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली आहे. ऑगस्टअखेर प्रकल्प पूर्ण भरण्याची शक्यता असून, हतनूर प्रकल्पाचे सहा दरवाजे पूर्णक्षमतेने उघडून विसर्ग केला जात आहे.
जिल्ह्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे जिल्ह्यातील मोठे. मध्यम व लघु प्रकल्पांत पाण्याची आवक होत आहे. हतनूर प्रकल्पात गेल्या २४ तासांत ५७.४० दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली आहे.
त्यामुळे प्रकल्पाचे सहा दरवाजे पूर्णक्षमतेने उघडून ३८ हजार ५७.६८ क्यूसेकने, तर शेळगाव बॅरेजचे सात दरवाजे एक मीटरने उघडून २७ हजार २१८.६८ क्यूसेकने तापी नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे.
‘ गिरणा’तून लवकरच विसर्गाची शक्यता
गिरणा नदी व प्रकल्प पाणलोट क्षेत्रात तसेच नाशिक जिल्ह्यात दमदार पावसामुळे चणकापूर ८५.५९, अर्जुनसागर ८६.५४ टक्के असा जलसाठा आहे. ठेंगोडा बंधारा, हरणबारी, नागासाक्या, केळझर व माणिकपुंज आदी प्रकल्प पूर्ण भरून अनुक्रमे चणकापूर १५५८, अर्जुनसागर ५९६. ठेंगोडा बंधारा २९४९, हरणबारी ८४६, नागासाक्या ५९० आणि केळझर २९२. असा सहा हजार ८३१ क्यूसेकने गिरणा प्रकल्पात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे गिरणा प्रकल्पाची जलपातळी ८५ टक्क्यांपर्यंत पोहोचली असून, लवकरच प्रकल्प १०० टक्के मरण्याची शक्यता आहे.