---Advertisement---
शहादा : तालुक्यातील मुबारकपुर, बहेरपूर, आडगाव येथील सुसरी नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. वाळू माफियांनी सुसरी नदी पात्राचे अक्षरशः लचके तोडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनदेखील प्रशासन उदासीन असल्याने वाळू मफियांनी आपले पाय घट्ट रोवले असल्याचे दिसून येत आहे.
या वाळू उत्खननातून अवैध रेतीचा दिवस रात्र मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याने नदी पात्रातील रेतीचे प्रमाण कमी झाल्याने परिसरातील भूजल पातळीमध्ये मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. यासह विविध प्रकारचे जल किडे, मासे या उपशामुळे नष्ट झाल्याने पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
रॉयल्टी न काढता वाळू वाहतूक
शहादा तालुक्यातील मुबारकपुर, बहेरपूर, आडगाव येथील सुसरी नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. ग्रामपंचायत वा ग्रामसभेचा ठराव न घेता व वाळू वाहतुकीची रॉयल्टी न काढता वाळू वाहतूक होत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करून देखील प्रशासन उदासीन असून, तात्काळ कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.