---Advertisement---
धुळे : घराच्या छतावरुन कोसळून पत्नीचा मृत्यू झाल्याचे सांगणारा पतीच मारेकरी असल्याची धक्कादायक बाब नरडाणा येथील घटनेबाबत पोलिस तपासात समोर आली आहे. २५ जून रोजीच्या या प्रकरणात पोलिसांनी रविवारी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. उदय भिल (वय ४९) असे पतीचे नाव असून सुनीता भिल (३३) हे पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली होती. मात्र, आता खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, उदय आणि सुनीता यांच्यात नेहमीच वाद होत असत. बहिणीला १२ हजार रुपये देण्याच्या कारणावरून त्यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. याच वादातून २५ जून रोजी उदयने लाकडी दांडक्याने सुनीताच्या डोक्यात प्रहार केला, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली होती. घटनेनंतर उदयने सुनीताला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याने डॉक्टरांना आणि पोलिसांना ती छतावरून कोसळल्याने जखमी झाल्याचे खोटे सांगितले. त्यानुसार, नरडाणा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
---Advertisement---
शवविच्छेदन अहवालाने फोडले बिंग
शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आणि त्यातील माहितीच्या आधारे पोलिसांनी अधिक तपास केला असता, हा अपघात नसून खून असल्याचे स्पष्ट झाले. नरडाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांनी वाढीव कलमानुसार गुन्हा दाखल करीत उदय भिल याला शोधून काढले आणि त्याला अटक केली. या कारवाईत नरडाणा पोलिस ठाण्याचे प्रभारी नीलेश मोरे यांच्यासह उपनिरीक्षक महाले, सहायक उपनिरीक्षक हेमंत पाटील, अर्पण मोरे, हे.कॉ. सूरज साळवे, राकेश शिरसाठ, सचिन बागुल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.