---Advertisement---
मुंबई : भाजपाची राष्ट्रवादाची विचारधारा तसेच मोदी सरकारचे लोकोपयोगी निर्णय राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन सामान्य माणसापर्यंत नेऊन पोहचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांच्या साथीने पार पाडेन, असा निर्धार भाजपाचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी व्यक्त केला.
वरळी डोम येथे प्रचंड उत्साहात पार पडलेल्या पक्षाच्या राज्य परिषदेच्या अधिवेशनात चव्हाण यांनी मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर बोलताना चव्हाण म्हणाले की, माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या छोट्या कार्यकर्त्याला देशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाते ही फार मोठी गोष्ट आहे. ही जबाबदारी सोपविल्याबद्दल मी पक्षाचा आभारी आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय निवडणूक अधिकारी व केंद्रीय मंत्री किरण रिजिजू, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सरचिटणीस व निरीक्षक अरुण सिंह, श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले आदी यावेळी उपस्थित होते.
भाजपा हीच माझी ओळख
नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, भाजपा हीच माझी ओळख आहे. कारण मला पक्षानेच घडवले आहे. मला घडविणाऱ्या पक्षासाठी काहीही करण्याची आपली तयारी आहे.