---Advertisement---
भुसावळ : एसटी महामंडळातर्फे आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना विशेष सुविधा देण्यात आली आहे. प्रवाशांनी ४५ च्या संख्येत एसटी बसची मागणी केली, तर भुसावळ आगारातून विशेष बस सोडून भाविकांना पंढरपूरपर्यंत नेले जाणार आहे. यामुळे वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे. या योजनेचा लाभ तालुक्यातील वारकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन एसटी आगाराच्या वतीने करण्यात आले आहे.
तालुक्यातील भाविक दरवर्षी आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनाकरिता जातात. यंदा २ ते १० जुलै या काळात आषाढी पंढरपूर यात्रा भरणार आहे. यात्रेकरिता जाणारे वारकरी दरवर्षी एसटी बससेवेचा लाभ घेऊन वारी पूर्ण करतात. तालुक्यातील वारकरी संप्रदायातील भाविकांना तसेच अन्य वारकऱ्यांना जाणे-येणे सोयीचे व्हावे, यादृष्टीने वारकऱ्यांनी किमान ४० च्या गटाने बसची मागणी केल्यास भुसावळ आगारातून बस पुरविण्याची व्यवस्था राज्य परिवहन महामंडळाच्या भुसावळ विभागाने केली आहे.
एकाच बसने प्रवाशाची सुविधा
भाविकांच्या सुविधेसाठी एसटीने यंदा विशेष बस सेवा सुरू केली आहे. ज्या बसने प्रवासी जाणार, त्याच बसने परत येण्याची सुविधा दिली जाणार आहे.
यांना मिळणार विशेष सुविधांचा लाभ
२ ते ७ जुलैदरम्यान पंढरीच्या विशेष वारीसाठी बसफेरी धावणार आहे.
विशेष बसमध्ये ६५ वर्षे ते ७५ वर्षे वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात ५० टक्के सवलत, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत मोफत प्रवासाची सवलत, तसेच सर्व महिलांना महिला सन्मान योजनेंतर्गत तिकिटांमध्ये ५० टक्के सवलत व शासनाने ठरवून दिलेल्या इतर सोयी-सवलती देण्यात येणार आहेत.
विनाविलंब बस सेवा मिळणार
तालुक्यातील प्रवाशांनी ४५ च्या संख्येने एकत्र मागणी केली, तर भुसावळ आगारातून बस सोडण्यात येणार आहे. विविध योजनांतील लाभार्थी प्रवाशांनाही या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. यासाठी किमान दोन दिवस अगोदर बसची मागणी करणे आवश्यक आहे. विनाविलंब बस सेवा उपलब्ध केली जाणार आहे.
नागरिकांनी बस सेवेसाठी येथे करावा संपर्क
पंढरपूर यात्रेकरिता जाणाऱ्या भाविकांनी भुसावळ आगारातील भंडारा आगार व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त भाविकांनी यात्रेकरिता जाणारे जादा बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रकांनी केले आहे.