---Advertisement---
धुळे : दारू पिण्यास विरोध केल्याने पतीने पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटनेत धुळे सत्र न्यायालयाने आरोपी पतीला पाच वर्षाच्या सश्रम कारावासासह आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच दंड न- भरल्यास सहा महिन्याची कारावासाची शिक्षा ठोठवली आहे. सरकारी पक्षाकडून जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह योगेंद्रसिंह तवर यांनी कामकाज पाहिले.
---Advertisement---
नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री ?
सुरेखा रवींद्र सोनवणे (रा. फागणे, मूळ रा. अजंग, ता. जि. धुळे) ही तिच्या माहेरी फागणे येथे पती रवींद्रसोबत राहत होती. रवींद्रला दारूचे भयंकर व्यसन होते. ७एप्रिल २०१४ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास रवींद्र आणि त्याचा भाऊ दीपक हे दोघे दारू पिऊन घरी आले. दारूच्या नशेत असलेल्या त्यांना पाहून सुरेखा संतापली आणि तिने दारू पिऊन का आलात, असे विचारले. यावरून संतापलेल्या दोघा भावांनी तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर, परिस्थिती आणखी बिघडली. दीपकने सुरेखाचे दोन्ही हात घट्ट पकडून ठेवले, तर रवींद्रने क्रूरपणे तिच्या पोटात चाकूने वार केला. या हल्ल्यात सुरेखा गंभीर जखमी झाली आणि रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळली. हा भयानक प्रकार घडल्यानंतर दोघेही भाऊ घटनास्थळावरून पळून गेले. सुरेखाच्या आई कलाबाई यांनी प्रसंगावधान राखत तातडीने तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी केलेल्या त्वरीत उपचारामुळे सुरेखाचा जीव वाचला. या भीषण हल्ल्याप्रकरणी सुरेखा हिने धुळे तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता.
सह आरोपी दीपक सोनवणेचा मृत्यू
या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक बिपीन चौधरी आणि पोलीस उपनिरीक्षक मिलींद बनसोडे यांनी केला. पोलिसांनी सखोल तपास करून आरोपपत्र दाखल केले. खटला सुरू असतानाच सह-आरोपी दीपक रावण सोनवणे याचा मृत्यू झाला. त्यामुळे हा खटला केवळ रवींद्रच्या विरोधात चालवण्यात आला. सत्र न्यायाधीश ज्ञानेश्वर आहेर यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू झाली. सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांनी युक्तिवाद केला. त्यांनी मुख्य फिर्यादी सुरेखा रवींद्र सोनवणे, साक्षीदार रोहिदास भिका सोनार, डॉ. दिनेश दहिते, तपास अधिकारी बनसोडे व चौधरी यांची साक्ष नोंदवली. अॅड. तवर यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांचा आधार घेत कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.