---Advertisement---
पारोळा : सागवान झाडे तोडण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात आठ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पारोळा वन विभागाच्या दोघा वनपालांना जळगाव एसीबीने रंगेहाथ पकडले. दिलीप भाईदास पाटील (वय ५२, मोंढाळे, ता. पारोळा रा. देवपूर धुळे) व वैशाली ज्ञानेश्वर गायकवाड (वय ३८, चोरवड, ता. पारोळा) अशी लाचखोर वनपालांची नावे आहेत. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे शेतात लावलेल्या सागवानची वृक्ष खरेदी करण्याचा व्यवसाय करतात. इंधवे शिवारातील एका शेतकऱ्यासोबत त्यांनी साठ हजारांचे सागवान लाकूड खरेदीसाठी व्यवहार केला होता. यासाठी वन खात्याकडून परवानगी मिळावी म्हणून त्यांनी रीतसर अर्ज केला होता.
या प्रकरणात वनपाल दिलीप भाईदास पाटील आणि वनपाल वैशाली ज्ञानेश्वर गायकवाड या दोन कर्मचाऱ्यांनी तक्रारदार यांच्याकडे आठ हजार रूपयांची मागणी केल्याची तक्रार जळगाव एसीबीला १९ जून रोजी प्राप्त झाली होती. त्यानुसार तक्रारदार यांच्याकडून वनपाल दिलीप पाटील यांच्या सांगण्यावरून वनपाल वैशाली गायकवाड पंचा समक्ष ८ हजार रुपये स्वीकारताना रंगेहात मिळून आले. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---Advertisement---
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे डीवायएसपी योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ सुरेश पाटील, मपोहेकॉ शैला धनगर, पोहेकॉ किशोर महाजन, पोकॉ राकेश दुसाने व पोकॉ अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.