---Advertisement---
धुळे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील एका कर्मचाऱ्याला व्हॉट्सअॅपवर बनावट सरकारी आदेश पाठवून आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका मोबाईल नंबरधारकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कर्मचारी प्रभाकर रघुनाथ पाटील (वय ४५, रा. साक्री रोड, धुळे) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, २ नोव्हेंबर २०२३ रोजी कार्यालयीन वेळेत, त्यांना त्यांच्या ९४२३५०११२१ क्रमांकाच्या मोबाइलवर ९७६६७७७६५७ या क्रमांकावरून महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाचा २३ ऑक्टोबर २०२३ चा एक बनावट शासन निर्णय व्हॉट्सअॅपद्वारे पाठवण्यात आला.
या बनावट आदेशात लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या २५१५-१२३८ या हेडखाली कामे मिळवण्याचा बनाव करण्यात आला होता. या खोट्या कागदपत्रांच्या आधारे, संबंधित संशयित आरोपीने जिल्हा परिषद आणि बांधकाम विभागाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी जि.प. कर्मचारी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मेसेज पाठविणाऱ्या मोबाईल नंबरधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.