---Advertisement---
जळगाव : सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण करून एका तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, शिरपूर येथील एका तरुणीसोबत संशयित अमोल राठोड (रा.नेरी, ता. जामनेर) याची सोशल मीडियावर ओळख झाली. दोघांचे नियमित मोबाइलवर बोलणे सुरू होते. दरम्यान, अमोल राठोड याने तरुणीला जळगाव बस स्थानकावर भेटण्यासाठी बोलविले.
तरुणी मी शाळेत जात असल्याचे आईला सांगून जळगावात आली. यावेळी अमोल हा मित्रासोबत तिला भेटण्यासाठी आला. तो तरुणीला मित्राच्या घरी घेऊन गेला. मित्र व त्याची पत्नी कामानिमित्त बाहेर गेले असता, तो तरुणीशी जबरदस्ती करू लागला. मात्र, तरुणीने त्यास नकार दिला. दरम्यान, त्याने त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास तरुणीला भाड्याने घेतलेल्या खोलीवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
त्यानंतर तो तरुणीला मित्राच्या घरी सोडून पसार झाला. याबाबत तरुणीने तिच्या मैत्रिणीला कळविले. तरुणीचे नातेवाईक हे जळगावात आले व तिला शिरपूर येथे घेऊन गेले. तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून अमोल राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोउनि. संजय तडवी करीत आहेत.
अल्पवयीन मुलीशी लग्न, पतीवर गुन्हा
धुळे : तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने लग्न करून तिला गर्भवती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धुळे तालुका पोलिसांनी संशयित तरुणाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, २० मे २०२४ रोजी वा तरुणाने मुलीशी बळजबरीने लग्न केले. त्यानंतर ती मुलगी आता तीन महिन्यांची गर्भवती आहे.