---Advertisement---
चंद्रशेखर जोशी (संपादक )
जळगाव : समाजात शिक्षक, डॉक्टरवर्गाकडे पहाण्याचा दृष्टीकोण आदरयुक्त आहे. असे म्हणतात की, शिक्षक ही देवाने समाजाला दिलेली सुंदर भेट आहे. शिक्षक हा देवासारखा आहे. कारण देव संपूर्ण जगाचा निर्माता आहे आणि शिक्षक हा एका चांगल्या राष्ट्राचा निर्माता आहे. या वर्गाकडे पहाण्याचा जनसामांन्यांचा हा दृष्टीकोन आहे. मात्र आज ही परिस्थिती आहे काय ?
शिक्षक वर्गाकडे पहाण्याचा दृष्टीकोन फार बदलला आहे. या पदावर पूर्वीच्या गुणवत्तेची व्यक्ती निश्चितच दिसत नाही. पूर्वी म्हटले जायचे ‘छडी लागे छम छम… विद्या येई घमघम’ आजचा शिक्षक त्या छडीचा वापर करू शकतो काय? तसे केले तर तो कायद्याच्या कचाट्यात सापडतो, शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे जो आपल्या संपूर्ण आयुष्याला त्याच्या ज्ञान, संयम, प्रेम आणि काळजीने एक चांगला आकार देतो. आपल्या विद्याथ्यांचे जीवन यशस्वी करण्यासाठी तो प्रयत्नशित असतो. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात कसे लावायचे हे शिक्षकच ठरवू शकतो. पण काळ बदलत चाललाय, शिक्षणाचे बाजारीकरण दिवसेंदिवस वाढत चाललयं. शिक्षण संस्था चालकांनी उभारलेल्या पंचतारांकित इमारती डोळे दीपविणाऱ्या ठरतात. आणि शिक्षणासाठी लागणारी फी तर बापरे बाप… गरीब विद्यार्थी या ठिकाणी स्वप्नही पाहू शकत नाही. तो बिचारा बापाची शेती करणे किंवा एखाद्या खासगी कंपनीत नोकरी करण्याला पसंती देतो. मग या संस्थांमध्ये गडगंज डोनेशन देऊन विद्यार्थी प्रवेश घेतात. उभारलेल्या इमारती व होणारा खर्च भागविण्यासाठी व आपल्या तिजोऱ्या भरण्यासाठी ही मंडळी विविध घोटाळे करतांना दिसतात.
सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे शिक्षक भरती घोटाळे, जळगाव जिल्ह्याचा विचार करता लक्षात येते की, काही शिक्षक सम्राटांनी लाखो रूपये घेऊन आपल्या संस्थांमध्ये शिक्षक भरती करून घेतली आहे. यात गुणवत्ता हा प्रकार अजिबात नाही. निकष केवळ पैसा अनेकांकडून खोके घेऊन ही मंडळी बोके झाल्याचे आता समोर आले आहे. यामागील या मंडळींची मोडस ऑपरेडी भलती भारी आहे.
जिल्ह्यात प्राथमिक माहितीनुसार सुमारे ३५० ते ४०० शिक्षकांची अशा पद्धतीने भरती झालेती असल्याची माहिती मिळते. संच मान्यतेत पदे वाढवून घेणे, ऑनलाईनमध्ये नावे टाकून घेणे, मागील तारखांनी मान्यता घ्यायची विशेष लबाडी अशी की या संस्थांच्या कार्यालयांमध्ये मान्यतेची फाईलच दिसून येत नाही. ही लबाडी लक्षात आल्यानंतर नाशिक रोड पोलीस स्टेशनला जिल्ह्यातील दहा ते पंधरा शाळांची चौकशी सुरू आहे. या प्रकारांमुळे काही शिक्षण सम्राटांचे धाबे दणाणले असल्याचे लक्षात येते. काहींची बचावासाठी धावपळ सुरू आहे तर काही मंडळी सत्ताधारी पक्षात प्रवेश करून आपला बचाव होऊ शकेल काय? अशा प्रयत्नात असत्याचे दिसून येते. काहीही असो पण ही मंडळी चांगलीच गब्बर झाल्याचे लक्षात येते.
पश्चिमेकडील अनेक खासगी माध्यमिक शाळांमध्ये असे प्रकार झाल्याचे समोर आले आहे. अगदी आपल्या विविध निवडणुकांमध्ये हे शिक्षण सम्राट शिक्षकांच्या पगारावर डोळा ठेवून असतात. नोकरी करायची मग बोलणार कुणाला? निमुटपणे एक-दोन पगार देऊन ही मंडळी मोकळी होते. अशा व्यक्तीमत्त्वांना कठोर शासन होण्याची गरज आहे. सरकार चौकशा करत आहे याचे स्वागतच, पण या मंडळींच्या हातात बेड्या पडल्याशिवाय शासनाने शांत बसू नये. अनुदान नसताना काही जणांना नोकरी दिली जाते. पण अनुदान सुरू झाल्यावर त्यांना बाहेर काढून त्यांच्या जागी नवीन नियुक्ती देऊन काळाबाजार केला जातो. या पद्धतीला आळा बसण्याची गरज आहे. कारण मोठ्या आशेवर वर्षानुवर्षे बिनपगारी काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्या पाठीत जर खंजीर खुपसला जात असेल तर अशा व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाणे गरजेचे आहे. राजकीय पक्षांनीदेखील मतांसाठी बेरजेचे राजकारण न करता या मंडळीना बाहेरचा रस्ता दाखविणे आवश्यक आहे.
पालकांची चिंता
शिक्षण आहे पण नोकरी नाही… अशी अनेक बेरोजगार मंडळी विविध भागात दिसून येते. केवळ शेती आहे म्हणून अनेकांचे लग्नही होऊ शकत नाही. उत्तम शेती हे समीकरण कधीच मागे पडले… प्रत्येक जण आपल्या मुलीसाठी नोकरदार वर शोधत असतो. परिणामी मुलाचे शिक्षण करून मिळेल त्या पद्धतीने त्याला नोकरी मिळविण्याचा अनेक पालकांचा प्रयत्न असतो. अनेक जण कर्जबाजारी होऊन लाखो रूपये या शिक्षण सम्राटांच्या घशात ओततात. शेंदुर्णी व परिसरातील एका शिक्षण संस्थेने अशा पद्धतीने अनेकांना नोकरी दिल्याचे समजते.