---Advertisement---
पाचोरा (प्रतिनिधी ) : तालुक्यातील जारगाव येथे एक मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. पत्नीवरील चारित्र्याच्या संशयातून संतापलेल्या पतीने चाकूने वार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. प्रियंका भदाणे (वय २५) असे मयत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खुशाल भदाणे असे आरोपी पतीचे नाव आहे. पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे भदाणे हा गेल्या 4 ते 5 वर्षांपासून भाडेकरू म्हणून राहत होता. खुशाल याला पत्नी प्रियंकाच्या चारित्र्यावर संशय होता. दरम्यान, याच संशयावरून दि. २० जुलै २०२५ रोजी पहाटे दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात खुशालने घरातील चाकुने प्रियंकाच्या गळ्यावर, मानेवर व पोटावर सपासप वार केले. या हल्ल्यात प्रियंका गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर खुशाल भदाणे याने देखील गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलाने बघितले आणि आरडाओरड केली. ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत, याबाबत पाचोरा पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, सहायक पोलीस निरीक्षक संजय निकुंभ, उपनिरीक्षक योगेश गणगे, राहुल शिंपी, योगेश पाटील, शरद पाटील, गणेश कुंवर, श्रीराम शिंपी यांनी घटनास्थळी धाव घेत, आरोपी खुशाल भदाणे यास ताब्यात घेतले.
मयत विवाहितेचा शव ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे हलविण्यात आला. या ठिकाणी शवविच्छेदन करण्यात आले असून शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मयताच्या पश्चात दोन लहान मुले आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी गणेश आव्हाड यांनी घटनस्थळाची भेट देत पाहणी केली. पोलीस अधिकारी यांना तपासाच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या आहेत. मोबाईल फोरेन्सिक लॅब व्हॅन पथकास पाचरण करण्यात आले असून, घटनस्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे.
या प्रकरणी मयत प्रियंका हिच्या मावशीने दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात आरोपी खुशाल भदाणे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय निकुंभ हे करीत आहेत.