---Advertisement---
नवी दिल्ली : जगदीप धनखड यांनी सोमवारी रात्री उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. प्रकृती अस्वास्थामुळे आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी तसेच वैद्यकीय चिकित्सकांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन करीत मी घटनेतील कलम ६७ (ए) च्या अंतर्गत तत्काळ प्रभावाने उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा देत आहे, असे त्यांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
देशाच्या राष्ट्रपतींनी दिलेल्या अढळ पाठिंब्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाचे मनापासून आभार मानतो. पंतप्रधानांचे मला अमूल्य सहकार्य लाभले. माझ्या कार्यकाळात मी खूप काही शिकलो आहे, असे धनकड यांनी पत्रात म्हटले आहे.
कार्यकाळाचा उल्लेख करताना, धनकड यांनी संसद सदस्यांचे मनापासून आभार मानले आणि म्हटले की, सदस्यांनी दाखवलेला विश्वास आणि प्रेम कायम स्मरणात राहील. माझ्या कार्यकाळात मला बरेच काही शिकायला मिळाले. या काळात भारताची प्रगती झाली. भारताचा आर्थिक उदय आणि जागतिक स्तरावरील परिवर्तनकारी युगात सेवा करण्याचा बहुमान मला मिळाला.
हे आदरणीय पद सोडताना, भारताच्या जागतिक उदयाचा आणि अभूतपूर्व कामगिरीचा मला अभिमान आहे आणि या देशाच्या उज्ज्वल भविष्यावर माझा अढळ विश्वास आहे. बंगालचे राज्यपाल असताना त्यांचा कार्यकाळ चांगलाच गाजला होता. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत त्यांचे नेहमी खटके उडायचे.
२०२७ पर्यंत होता कार्यकाळ
ज्येष्ठ राजकारणी आणि कायदेतज्ज्ञ जगदीप धनकड यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये भारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला आणि त्यांच्या कार्यकाळात ते राज्यसभेचे अध्यक्ष म्हणूनही काम करीत होते. त्यांचा राजीनामा भारताच्या राजकारणातील अनपेक्षित घडामोड आहे. त्यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत होता.