---Advertisement---
---Advertisement---
शिरपूर : शिरपूर-शिंदखेडादरम्यान दभाशी गावानजीक मंगळवारी (29 जुलै) सकाळी साडेआठच्या सुमारास शिरपूर- शिंदखेडा बसला मालमोटारीने जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील 10 वर्षीय मुलगी ठार, तर 22 प्रवासी जखमी झाले असून, पैकी 15 प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना चार रुग्णवाहिकांतून धुळे व शिरपूरला हलविण्यात आले असून, नूपुर गणेश माळी असे मृत बालिकेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर येथून शिंदखेड्याकडे जाणारी बस (एमएच 14, बीटी 2112) मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर दभाशी गावानजीक आली असताना, समोरून येणाऱ्या ट्रकने (आरजे 11, जेसी 3487) बसला मधोमध जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, बस मधोमध कापली गेली आहे. धडकेने मोठा आवाज झाला आणि बसमधील प्रवाशांमध्ये आरडाओरड सुरू झाली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेतली. तालुका प्रशासन आणि पोलिसांना माहिती तातडीने कळविण्यात आली. पोलिसांसह आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले असून, तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमींना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांसह पोलिस प्रशासनाकडून बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले. यासाठी तातडीने चार रुग्णवाहिका घटनास्थळी पाचारण करण्यात आल्या. रुग्णवाहिकांतून जखमी प्रवाशांना शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात तसेच अधिक गंभीर जखमींना धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अपघातात 10 वर्षीय नूपुर गणेश माळी ही जागीच ठार झाली, तर 22 जखमी झाले असून, पैकी 15 प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर धुळे व शिरपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दुतर्फा तीन-चार किलोमीटर वाहनांचा रांगा लागल्या होत्या. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, शिरपूर व धुळे येथील रुग्णालयात सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नातेवाइकांनी धाव घेतली, शहर पोलिस व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली. अपघातानंतर परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले.
अपघातातील जखमी
रेखाबाई चुडामण माळी (42), चैताली चुडामण माळी (20), इंदूबाई सीताराम माळी (80), दगूबाई आत्माराम माळी (65), वर्षा दिनेश माळी (वय 18, सर्व रा. सोनशेलू), अश्विनी अमोल भावसार (17, दोंडाईचा), सुरेश मन्साराम माळी (50), यमुनाबाई महारू पवार (50), सुशीला विकास बोरसे (40), बिलाल नवाब शेख (24), नालिब सलीम खाटिक (29), सलीम शेख इस्माईल (21), जियाउद्दीन नबाबउद्दीन शेख (36), रोहिणी रघुनाथ महिरे (45), गोरख भालचंद्र पाटील (60, सर्व रा. शिरपूर), प्रवीण गुलाब पाटील (23, अर्थे, ता. शिरपूर), अरुणाबाई संभाजी माळी (42), निर्मलाबाई सुरेश माळी (51, सर्व रा. पाटण, ता. शिंदखेडा), प्रफुल्ल ज्ञानेश्वर पवार (40, नेवाडे), शैलेंद्र प्रल्हादसिंग परदेशी (50, रा. शिंदखेडा), राहुल सूर्यकांत विंचूरकर (36, रा. धरणगाव), रतिलाल सुका धनगर (75, रा. अकुलखेडा).