---Advertisement---
---Advertisement---
पाचोरा : शहरातील वृंदावन पार्क भागात घरात घुसून अज्ञान चोरट्याने दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली. ही चोरी या घरात फर्निचरचे काम करणाऱ्या मिस्तरीने केल्याचे निष्पन्न झाले असून त्याला अटक करण्यात आली आहे.
या भागातील रहिवासी असलेल्या अश्विनी राजेश डहाळे यांच्या मालकीच्या घरात अज्ञात चोरट्याने घरी कोणीही नसताना प्रवेश करून १ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे नेकलेस व कपाटात ठेवलेले रुपये १५०० रोख असा एकूण १ लाख ६ हजार ५०० रूपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत अश्विनी डहाळे यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
पाचोरा पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत अवघ्या २४ तासात चोरट्यास जेरबंद केले आहे. पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकों गजानन देशमुख, पोकॉ संदीप राजपूत, जितेश पाटील, हरीश परदेशी, कमलेश राजपूत यांनी योग्य दिशेने तपास करून डहाळे यांच्या घरी फर्निचरचे काम करणारा मिस्तरी रमेशकुमार श्यामलाल जंगीड (४९, सिकर-राजस्थान, ह. मु. स्टेट बैंक कॉलनी, पाचोरा) यास अटक केली.
या मिस्तरीकडे चौकशी केली असता त्या मिस्तरीने चोरी केल्याचे कबूल केले. चोरी केलेला मुद्देमाल नेकलेस व रोख रक्कम पोलिसांच्या स्वाधीन केली. फर्निचर करणारा मिस्तरीच चोरटा निघाल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत.