---Advertisement---
धडगाव : पंचायत समितीच्या अखत्यारीत येणाऱ्या विकासकामाचे दोन वेगवेगळ्या राजकीय गटांकडून एकाच दिवशी दोन वेळा नूतन इमारतीच्या बांधकामचे भूमिपूजन करण्यात आल्याने परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.
एकाच प्रकल्पाचे सकाळी भाजपतर्फे सरपंच व उपसरपंचांच्या हस्ते तर दुपारी शिंदेसेनेचे आ. आमश्या पाडवी यांनी भूमीपूजन केले. एकाच प्रकल्पाचे दोन वेळा भूमीपूजन ही राजकीय की विकासाची स्पर्धा अशी चर्चा सुरू झाली आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरू असलेल्या राजकीय संघर्षाचे पडसाद विकासकामांवर कसे उमटतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धडगाव पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा मार्ग अखेर मोकळा झाला. धडगाव तालुक्यातील धनाजे खुर्द येथील रोजरीपाडा येथे या नवीन इमारतीमुळे पंचायत समितीच्या कामकाजाला गती मिळणार असून, परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
एकाच छताखाली कामकाज
या प्रकल्पासाठी ५ कोटी ६३ लाख ४६ हजार रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. या नूतन इमारतीमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विविध विभागांचे कामकाज एकाच छताखाली, सुनियोजित पद्धतीने चालण्यास मदत होणार आहे.