---Advertisement---
सुनिल महाजन
नशिराबाद, प्रतिनिधी : मारुति ऑल्टो गाडीतून गोमांस तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नशिराबाद येथील बालाजी लॉन शेजारी, मुंजोबा मंदिरा समोरील पाटावर या गाडीचा अपघात झाल्यामुळे ही धक्कादायक बाब उघडकीस आली. पोलिसांनी अंदाजे १५० किलो वजनाचे गोमांस जप्त केले असीम, दोन वाहने ताब्यात घेत नशिराबाद पोलिस ठाण्यात जमा केली आहे.
नशिराबाद येथील बालाजी लॉन शेजारी, मुंजोबा मंदिरा समोरील पाटावर गोमास तस्करी करणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. भुसावळहुन जळगावकडे भरधाव वेगाने येत असलेली मारुती ऑल्टो (एमएच 19 बीयू 9957) गाडी अचानक नियंत्रण सुटून दोन पलट्या खाऊन रस्त्याच्या कडेला पडली. गाडीत तिन्ही प्रवासी जखमी अवस्थेत अडकून बसले होते.
घटनास्थळी काही वेळाने (एमएच 19 सीडब्ल्यू 3765) क्रमांकाची रिक्षा आली. त्यात तीन इसम होते. गावातील काही तरुण मदतीसाठी धावले असता, त्यांना संशयास्पद हालचाली दिसल्या. तरुणांनी पाहिले की ऑल्टो गाडीतून गोमांस काढून रिक्षात भरले जात होते. तातडीने गोरक्षकांना संपर्क करून ते घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यावेळेस तेथे मोटारसायकल आलेला एक इसम या वाहनांवर पाळत ठेवत होता. असे मदत करणाऱ्या तरुणांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, संधीचा फायदा घेत रिक्षातील तिन्ही इसम रिक्षा सोडून फरार झाले. नंतर गोरक्षक व पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी अंदाजे १५० किलो वजनाचे गोमांस जप्त करून, दोन्ही वाहने ताब्यात घेत नशिराबाद पोलिस ठाण्यात जमा केली. ऑल्टो गाडीमधील कागद तपासले असता त्यात मोसिम सलीम पिंजारी हरी विठ्ठल नगर नावाने लायसन्स कॉपी मिळाली. तसेच गाडी बाबू पवार, अभोदा खुर्द, रावेर असे गाडीचे कागद मिळाले असून पोलिसांनी ते ताब्यात घेतले आहे. मारुती ऑल्टोतील जखमींना पोलिसांनी उपचारासाठी जळगाव येथे हलवले असून, नशिराबाद पोलीस पुढील तपास करीत आहेत.