Pratibha Shinde : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सर्वत्र आढावा बैठका, सभा, विशेष मोहिमा घेणे सुरू आहे. अशातच काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला असून, काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
प्रतिभा शिंदे यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. विशेषतः शिंदे यांना पक्षाने नुकतीच दुसऱ्यांदा प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. अर्थात प्रदेश कार्यकारिणीवर संधी मिळून आठ दिवस उलटत नाही, तितक्यात शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
राजीनाम्याचे कारण अस्पष्ट
मात्र, राजीनाम्याचे नेमके कारण त्यांनी पत्रात नमूद केलेले नाही. परंतु, मंगळवारी जळगावमध्ये आपल्या पुढील वाटचालीविषयी भूमिका त्या पत्रकारांसमोर जाहीर करणार असलयाचे सांगितले.
‘या’ पक्षात करणार प्रवेश
दरम्यान, प्रतिभा शिंदे अजित पवार गटाच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रानुसार समोर आली आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिंदे यांचा जळगाव येथे हा पक्ष प्रवेश होणार असल्याचे ही बोलले जात आहे.