---Advertisement---
नंदुरबार : शहादा तालुक्यातील तिखोरा शिवारात वाळूचोरी करणाऱ्या दोघांनी ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठीला आत्महत्येची धमकी देत कारवाईपासून पळ काढण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी शेवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोशन जावरे व अंबालाल ठाकरे यांच्याविरोधात शहादा पोलिस ठाण्यात अवैध वाळूचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहादा तालुक्यातील मलोणी येथील ग्राम महसूल अधिकारी कल्पेश भालचंद्र शेवाळे यांना तिखोरा शिवारात वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी परिसरात तपास केला असता, दोन जण अवैधरीत्या ट्रॅक्टरमध्ये वाळू भरताना दिसून आले.
रोशन जावरे (३०) व अंबालाल व ऊर्फ जय ठाकरे (कोळी) अशी दोघांची नावे आहेत. दोघांना ग्राम महसूल अधिकारी शेवाळे यांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता, त्यातील अंबालाल ठाकरे याने फिनाइल पिऊन आत्महत्या करून घेईल अशी धमकी देत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. दोघेही या भागात अवैधरित्या वाळू भरुन वाहून नेत असल्याची माहिती मिळाल्याने तलाठी यांनी येथे भेट दिली होती.
याप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी शेवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोशन जावरे व अंबालाल ठाकरे यांच्याविरोधात शहादा पोलिस ठाण्यात अवैध वाळूचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद पाटील करत आहेत.