---Advertisement---
जळगाव : शहरातील मोकाट श्वानांवर निर्बीजीकरण केंद्रातील दुरुस्ती आणि पिंजरे तसेच अन्य सुविधा न करताच उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशने श्वान पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याचे काम सुरू केले आहे. या बाबत महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार आल्याने आरोग्य विभाग मक्तेदार संस्थेला कारणे दाखवा नोटीस देणार आहे. तसेच मंगळवारी सहायक आयुक्त निर्बीजीकरण केंद्राची पाहणी करणार आहे.
जळगाव महानगरपालिकेने मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी मुंबईच्या उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनला कंत्राट दिले आहे. यानुसार, निर्बीजीकरण केंद्राचे आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते श्वान पकडण्याची रुग्णवाहिका तसेच केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. परंतु केंद्रातील करारानुसार सुविधा जो पर्यंत मक्तेदार पूर्ण करत नाही तो पर्यंत श्वान पकडण्याची कारवाई सुरू न करण्याच्या सूचना मनपाच्या आरोग्य विभागाने दिल्या होत्या.
परंतु अजूनही अनेक सुविधा केंद्रात पुरेशा सुविधा नसताना श्वान पकडणे व निर्बीजीकरणाचे काम संस्थेने सुरू केले आहे. त्यामुळे मनपाचा आरोग्य विभाग संस्थेला कारणे दाखवा नोटीस देणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे अद्याप बसविले नाही उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनतर्फे श्वान निर्बीजीकरण केंद्रात अद्याप सुविधांचे कामे पूर्ण झालेली नाही. यात सीसीटीव्ही कॅमेरे यासह अन्य सुविधांचे काम अद्याप अपूर्ण असल्याची माहिती समोर आली आहे.
शहरातील स्वच्छतेसाठी बीव्हीजीला ग्रीन सिग्नल वॉटरग्रेस कंपनीची याचिका खंडपीठाने फेटाळली
शहरातील दैनंदिन स्वच्छता व कचरा संकलनाचा कंत्राटावरून खंडपीठात वाद सुरू होता. बीव्हीजी कंपनीला मनपाने कंत्राट दिले असून यावर औरंगाबाद खंडपीठाने वॉटर ग्रेस कंपनीची याचिका दाखल केली होती. ही याचिका खंडपीठाने सोमवारी १८ रोजी फेटाळून लावली असल्याने शहरातील दैनंदिन स्वच्छतेचे काम करण्याचे कामाला बीव्हीजी कंपनीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
औरंगाबाद खंडपीठात ११ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत मनपा आणि बीव्हीजी कंपनीच्या वतीने अॅड. राजेंद्र देशमुख आणि अॅड. निर्मल दायमा यांनी बाजू मांडली, तर वॉटर ग्रेस कंपनीकडून अॅड. अभिनव चंद्रचूड यांनी बाजू मांडली होती. या याचिकेवरील न्यायालयाने वॉटर ग्रेस कंपनीची याचिका फेटाळून लावली. यामुळे स्वच्छतेचा मक्ता आता बीव्हीजीकडेच राहणार आहे. सप्टेंबरपासून स्वच्छतेला होणार सुरुवात शहर साफसफाईच्या ठेक्याबाबत जळगाव महानगरपालिका आणि बीव्हीजी कंपनी यांच्यात करार झालेला आहे. तसेच कायदिश देखील महापालिकेने बीव्हीजी कंपनीला दिले आहे. तसेच न्यायालयाच्या निकालाने बीव्हीजी कंपनीला ग्रीन सिग्नल मिळाल्याने १ सप्टेंबरपासून बीव्हीजी कंपन शहर स्वच्छतेच्या कामाला सुरुवात करणार आहे.