---Advertisement---
भुसावळ : पाणलोट क्षेत्रात 24 तासात झालेल्या एकूण 429 मिमी पावसामुळे हतनूर धरणाची जलपातळी वाढली असून धरणाचे सहा दरवाजे पूर्ण क्षमतेने तर 18 दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहे. धरणातून प्रती सेकंद 72007 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे व आणखी काही तासात तो वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, तापी नदीला पूर आल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाऊस
हतनूर धरणाच्या पूर्णा व तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे आवक वाढली. धरण पातळीत या पावसामुळे पाण्याची आवक वाढली. पाण्याच्या झालेल्या वाढीमुळे पूर व्यवस्थापनासाठी सोमवारी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला. काल सकाळी दोन दरवाजे पूर्ण तर सहा दरवाजे एक मीटरने उघडले होते. यानंतर चार दरवाजे पूर्ण व 16 दरवाजे एक मीटरने उघडून विसर्ग झाला. दुपारी एक वाजता 4 दरवाजे पूर्ण व 16 दरवाजे एक मीटरने असे एकूण 20 दरवाजे उघडून विसर्ग करण्यात आला. तर मंगळवारी सकाळी 9.30 वाजता धरणावरील सूत्रांच्या माहितीनुसार, सहा दरवाजे पूर्ण क्षमतेने तर 18 दरवाजे एका मीटरने उघडण्यात आले आहेत.
यंदाच्या पावसाळ्यातील हा सर्वांत मोठा विसर्ग आहे. यापूर्वी या पावसाळ्यात यापेक्षा अधिक विसर्ग झाला नव्हता. यामुळे तापीनदी दुथडी भरुन वाहत आहे. धरणात आवक वाढल्यास विसर्ग देखील वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासन अलर्ट आहे. सोमवारी (18 ऑगस्ट) रोजी झालेला पाऊस असा (मिलीमीटरमध्ये) बऱ्हाणपूर- 25.22, देढतलाई- 92.6 , टेक्सा- 124.4 एरडी- 14.2, गोपालखेडा- 49.4,चिखलदरा – 11.8 , लखपुरी- 52.0, लोहारा- 29.2, अकोला- 30.2 दरम्यान, एकूण 429 मिलीमीटर पाऊस झाला असून त्याची सरासरी 47.7 असल्याचे सूत्रांनी कळवले आहे. धरणाची ग्रॉस स्टोरेज 242.40 (62.47 टक्के) तर लाईव्ह स्टोरेज 109.40 (43 टक्के) आहे.
जोरदार पावसाची शक्यता
भुसावळ विभागात 21 ऑगस्टपर्यंत पावसाची स्थिती आहे. या कालावधीत काही ठिकाणी हलक्या ते मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. 22 ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरेल. मात्र अधूनमधून हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील. बुधवारपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी वर्तवला आहे.