---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून लाचखोरांच्या संख्येत वाढ झाली आहे. अशातच पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन पोलिसांसह एका इसमाला लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली असून, या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
बाळकृष्ण मुकुंदा पाटील (वय-55), आत्माराम सुधाम भालेराव (वय 57) दोन्ही नेमणून भुसावळ तालुका पोलीस स्टेशन खाते पोलीस विभाग (वर्ग 3) व ठाणसिंग प्रतापसिंग जेठवे (वय 42, रा. शिपूर कन्हाळा ता. भुसावळ (खाजगी इसम) असे अटक आरोपींचे नावे आहेत.
तक्रारदार यांच्याविरुद्ध खामगांव कोर्ट जि. बुलढाणा येथे कलम 138 प्रमाणे चेक बाऊन्सची केस दाखल आहे. तक्रारदार यांच्याविरुद्ध कोर्टाने अटक वॉरंट काढले होते. या वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी व अटक वॉरंट कॅन्सल करण्याची मुदतवाढ देण्याचा मोबदल्यात यातील आलोसे 1 व 2 यांनी 5000/- रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी आज, शुक्रवारी ला.प्र. विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती.
लाचमागणी पडताळणी केली असता यातील आलोसे 1 व 2 यांनी पंचासमक्ष 2000/- रुपये लाचेची मागणी केल्याची निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचून दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई भुसावळ शहरातील मामा बियाणी शाळा परिसरात करण्यात आल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी मनपाच्या लिपिकाला अटक
गेल्या काही दिवसांपूर्वी निविदेसाठी भरलेली ३५ हजारांची अनामत रक्कम परत मिळण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच स्वीकारताना महापालिकेच्या आरोग्य विभागातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतीच रंगेहात अटक केली होती. लिपिक आनंद जनार्दन चांदेकर (वय ३७) याच्यासह कंत्राटी शहर समन्वयक राजेश रमण पाटील (वय ३५) यालाही ताब्यात घेण्यात आले होते.