---Advertisement---
पुणे : पुराणात सावित्री ही मृत्यूची देवता यमापासून आपले पतीचे प्राण वाचवते असा उल्लेख आपण वाचला असलेच. असाच काहीसा प्रकार पुणे येथे समोर आला आहे. मरणाच्या दारात असणाऱ्या पतीला यकृत दान करुन त्याचे प्राण वाचविण्याचे प्रयत्न पत्नीने केला. दुर्दैवाने ही महिला आपल्या पतीचे प्राण वाचविण्यात आपयाशी ठरली असून या प्रयत्नात तिने आपले प्राण देखील गमावले. मृतांची नावे बापू बाळकृष्ण कोमकर आणि त्यांची पत्नी कामिनी बापू कोमकर असे आहे.
सह्याद्री रुग्णालयातून ही अतिशय दुःखद घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागील बुधवारी यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेनंतर शुक्रवारी म्हणजेच दोन दिवसांनी बापू कोमकर यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नी कामिनी कोमकर यांचेही रविवार, २४ ऑगस्ट रोजी निधन झाले. कामिनी यांनी तिच्या पतीला जीवनदान देण्यासाठी तिचे यकृत दान केले होते. या दोन्ही शस्त्रक्रियांसाठी लाखो रुपयांचा खर्च आला. हा खर्च दोघांनी आपली मालमत्ता विकून केला होता. परंतु. तज्ञ डॉक्टर अनुपस्थित राहिल्याने चुकीच्या पद्धतीने ही शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे या दोघांचा मृत्यू ओढवला असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
या शस्त्रक्रियेसाठी कोमकर कुटुंबाने त्यांचे घरही गहाण ठेवले होते, असे माहिती समोर येत आहे. नातेवाईकांनी सह्याद्री हॉस्पिटल आणि तेथील डॉक्टरांवर गंभीर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की जर योग्य उपचार केले असते तर या जोडप्याचे प्राण वाचू शकले असते. या घटनेनंतर कुटुंबाने रुग्णालय व्यवस्थापन आणि संबंधित डॉक्टरांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.
त्याच वेळी, प्रकरणाचे गांभीर्य पाहून, महाराष्ट्र आरोग्य विभागाने रुग्णालयाला नोटीस बजावली आहे. सह्याद्री रुग्णालयाचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. नागनाथ येम्पले म्हणाले की, यकृत प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेशी संबंधित सर्व माहिती सोमवारपर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांनी सांगितले की, या संदर्भात रुग्णालयाला नोटीस बजावण्यात आली आहे.
---Advertisement---
रुग्णालयाला यकृत प्राप्तकर्ता आणि दात्याची माहिती, त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पाठवण्यासंदर्भांत कळविण्यात आले आहे. दरम्यान, रुग्णालयाने म्हटले आहे की यकृत प्रत्यारोपण मानक वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार करण्यात आले आहे. रुग्णालय व्यवस्थापनाने एका निवेदनात म्हटले आहे की आम्ही तपासात पूर्ण सहकार्य करत आहोत. प्रकरणाचा व्यापक आढावा घेण्यासाठी आम्ही आवश्यक असलेली सर्व माहिती आणि मदत देण्यास तयार आहोत.