---Advertisement---
धुळे : देवदर्शन करुन धुळे महामार्गाने जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील खासणे गावातील एका कुटुंबाला लळींग घाटात साधूच्या वेष धारण केलेल्या टोळीने लुटले होते. या लूटमार करणाऱ्या उत्तराखंडातील टोळीला मोहाडी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या नेतृत्वाखालील करण्यात आली. या चोरट्यांनी अनेक ठिकाणी अशा पद्धतीने लुटल्याची माहिती उघड होत आहे.
ललीता नरेंद्र पाटील(रा. खासणे ता. चोपडा जि. जळगाव ) या आपल्या परिवारासह देवदर्शन करून धुळे मार्गे घरी परतत होत्या. धुळे शहरा जावळीत लळींग घाटात साधूच्या वेशातील एका व्यक्तीने त्यांची गाडी अडवली. पाणी द्या आणि आशीर्वाद घ्या असे सांगत त्याने प्रवाशांना गाडीतून खाली उतरण्यास भाग पाडले. प्रवाशांनी खाली उतरल्यावर त्याच्या पाया पडल्या.
यावेळी त्याने दोन महिलांना खालीच थांबण्यास सांगितले. यानंतर अचानक चाकूचा धाक दाखवत दागिने काढून घेतले. त्यानंतर पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून आरोपी घटनास्थळावरून पसार झालेत . या घटनेनंतर ललीता पाटील यांनी मोहाडी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवून पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली होती.
मुंबई-आग्रा महामार्गावर गस्त घालताना पोलिसांना गरताडबारी येथे साधूच्या वेशात एक संशयित पायी जाताना दिसला. चौकशीत तो उडवा-उडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी कसून विचारपूस केली असता तो उत्तराखंडातील हरिद्वार जिल्ह्यातील घेसुपुरा सफेरा वस्ती येथील जागीरनाथ बाबुनाथ नाथसफेरे येथील असल्याचे उघड झाले.
त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार रस्त्यावर लूट करणान्या टोळीत गोविंदनाथ कल्लूनाथ नाथसफेरे, सौदागर बाबुनाथ नाथसफेरे, विक्की मोसमनाय नाथसफेरे आणि कांता मोसमनाथ नाथसफेरे यांचा सहभाग असल्याचे समोर आले. पोलिसांनी सर्वांना अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कारही जप्त करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहन पाटील, पंकज चव्हाण, मुकेश मोरे, प्रकाश जाधव, रमेश शिंद व मनिष सोनगिरे यांनी ही कारवाई यशस्वी केली.