---Advertisement---
जळगाव : जम्मू-काश्मिरातील वैष्णोदेवी मंदिराला जाणाऱ्या मार्गावर भूस्खलन होऊन दरड कोसळली आहे. त्यात अडकून पडलेल्या जिल्ह्यातील दोन महिला भाविक सुरक्षीत असून, अन्य ४० भाविक एका खासगी हॉटेलमध्ये सुखरूप असल्याची माहिती त्यांच्यांशी संपर्क साधलेल्यांनी दिली आहे. चमकदेवबाई मिश्रीलाल राठोड व रंजना भागवत चव्हाण असे या महिलांचे नाव आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील तालखेडा, पारंबी, मोरझिरा व उमरा गावांतील ४२ भाविक २२ रोजी वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी रवाना झाले होते. ते सर्व मंदिराच्या दिशेने निघाले. त्यातील चमकदेवबाई राठोड व रंजना चव्हाण या दोघी मंदिर परिसरात जाऊन पोहोचल्या, मात्र सोबतच्या अन्य भाविकांना मार्गावर भूस्खलन होऊन दरड कोसळल्यामुळे सुरक्षा दलाने रोखले आणि त्यांना परत पाठविले.
या परतलेल्या भाविकांनी एका हॉटेलमध्ये मुक्काम केला. उमरा येथील शिंदेसेनेचे शाखाप्रमुख संदीप पवार यांनी पहाटे तीनच्या सुमारास मंदिर परिसरात अडकलेल्या दोन्ही महिलांशी संपर्क केला. त्यांना मंदिर परिसरातच थांबण्याच्या सूचना सुरक्षा यंत्रणेने दिल्याने त्यांना तिथेच मुक्काम करावा लागल्याची माहिती या दोघींनी दिली.
आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
आमदार चंद्रकांत पाटील यांना या घटनेची माहिती मिळताच मतदारसंघातील नातेवाईकांकडून व तालुका प्रमुख नवनीत पाटील यांच्याकडून माहिती घेत प्रशासनाला देखील सूचना केल्या. स्थानिक प्रशासन तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात आहे. जिल्ह्यातील सर्वच भाविक सुखरूप असल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागही भाविकांची माहिती घेऊन मदतकार्य राबवीत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.