---Advertisement---
धुळे : जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवात वाढ झाली आहे. हे भटके कुत्रे रस्त्याने जाणाऱ्यांवर धावून जाण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. तर काही ठिकाणी या कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केल्याचे उघड झाले आहे. असाच प्रकार बलदे गावात घडला असुंत परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बलदे गावात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या एका माकडाचा मृत्यू झाला. यानंतर ग्रामस्थांनी त्याचे अंतिम संस्कार करून शोक व्यक्त केला. या दरम्यान, हनुमान मंदिर परिसरात दशक्रिया विधी करण्यात आली.
धुळे जिल्ह्यातील बलदे नावाचे एक गाव आहे. या गावात २३ ऑगस्ट रोजी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर गंभीर जखमी माकड जंगलाकडे पळून गेले. मात्र, त्याला उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण गावाचे मुंडण करण्यात आले. सर्वप्रथम गावातील राजेंद्र पाटील यांनी हे मृत माकड पाहिले आणि त्यांनी गावकऱ्यांना याबद्दल माहिती दिली. ही बातमी ऐकताच संपूर्ण गावातील वातावरण उदास झाले. या घटनेने ग्रामस्थ भावुक झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
गावकऱ्यांनी मृत माकडाला फक्त एक प्राणी मानण्याऐवजी कुटुंबातील सदस्य म्हणून आदर दिला. यावेळी माकडाचे पूर्ण धार्मिक विधी करुन अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर या माकडाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आले. अंत्यसंस्कारादरम्यान गावातील वातावरण एखाद्या प्रिय व्यक्तीच्या शेवटच्या निरोपासारखे वाटत होते. यावेळी पुरुष, महिला आणि मुले सर्व उपस्थित होते. या दुःखद घटनेनंतर गावकऱ्यांनी पाच दिवस गावात शोककळा पाळण्याचा निर्णय घेतला.
मंगळवारी (२७ ऑगस्ट) गावातील हनुमान मंदिर परिसरात दशक्रिया विधी पार पडली. हा विधी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर केल्या जाणाऱ्या पारंपारिक विधींप्रमाणेच होता. कार्यक्रमाची सुरुवात हनुमान चालीसाच्या सामूहिक पठणाने झाली. सुमारे अडीच ते तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावातील बहुतेक लोकांनी या धार्मिक विधीमध्ये भाग घेतला. लोकांनी या माकडाला भगवान हनुमानाचे प्रतीक मानून त्याला श्रद्धांजली वाहिली.
---Advertisement---
दशक्रिया विधीदरम्यान, गावकऱ्यांनी आपले दुःख व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला. गावातील पुरुषांनी माकडाच्या मृत्यूला कुटुंबाचे नुकसान मानत असल्याचा संदेश देण्यासाठी आपले मुंडण केले. महिलांनी ‘सूतक’ पाळून आपापल्या पद्धतीने आपले दुःख आणि आदर व्यक्त केला. संपूर्ण गावात असा सामूहिक शोक यापूर्वी कधीही पाहिला नव्हता.
धार्मिक कार्यक्रम संपल्यानंतर गावातील लोकांनी सामुदायिक मेजवानीचे आयोजन केले. यासाठी पंढरपूर येथील प्रसिद्ध विठ्ठल-रुक्माई मंदिर परिसराची निवड करण्यात आली. गावातील सर्व नागरिकांनी मेजवानीत सहभागी होऊन संपूर्ण कार्यक्रमाला सामूहिक श्रद्धांजलीचे स्वरूप दिले. यावेळी गावात सामाजिक एकता आणि धार्मिक श्रद्धेचा अद्भुत संगम दिसून आला. या संपूर्ण कार्यक्रमात माजी आमदार संभाजीराव पाटील यांनी विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य केले.