---Advertisement---
Gulabrao Patil : पत्रकार खरी बातमी चांगली मांडत नाही, चुकीचे लिहीतात. डीपीडीसीच्या बैठकीतून बाहेर जात नसतील तर पत्रकारांवर गुन्हा दाखल करावा लागेल, अशी खुली धमकी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना दिली. दरम्यान या धमकीमुळे लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे सत्ताधारी आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन समितीच्या पहिलीच वार्षिक आढावा बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत जिल्ह्याचे वार्षिक नियोजन विकास आराखड्यावर चर्चा होत असते. तसेच या बैठकीत कुठलेही गोपनीय कार्य होत नसल्याने वृत्तांकनासाठी दैनिक आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनीधींना पूर्वसूचना दिली जाते. शुक्रवारी मात्र पहिल्याच आढावा बैठकीत पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला. यावेळी पोलिसांनीही त्यांच्या वर्दीचा वापर केला. प्रत्यक्षात या बैठकीला जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित नसतांनाही हा प्रकार घडला.
पालकमंत्र्यांनी धमकावले
डिपीडीसीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात. ज्यांच्याकडे पालकत्वाची भूमिका आहे, तेच पत्रकारांना धमकावू लागले आहेत. जिल्हा नियोजनच्या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चक्क ‘बैठकीतून बाहेर जा, अन्यथा गुन्हा दाखल करू’ अशा शब्दात पत्रकारांना धमकी दिली. यावरून आमदार मंगेश चव्हाण यांनी नियोजन बैठकीत पत्रकारांना बाहेर ठेवणे योग्य नाही त्यांना बैठकित प्रवेश द्यावा अशी बाजू मांडली.
मंत्री, आमदारांचे कार्यकर्ते, रिलस्टारला अनाधिकृत प्रवेश
जिल्हा नियोजन बैठकीपासून पत्रकारांना लांब ठेवण्यात आले होते. दुसरीकडे मात्र मंत्री आणि आमदारांचे कार्यकर्ते आणि रिलस्टार यांना मात्र अनाधिकृतरित्या बैठकीत प्रवेश देण्यात आला होता. पोलिसांनी देखिल त्यांना प्रवेश नाकारण्याची हिंमत दाखविली नाही. सदस्य नसतांना कायकर्ते आणि रिलस्टारला प्रवेश दिलाच कसा? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.