---Advertisement---
जळगाव : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत केळी लागवड केलेल्या जळगाव तालुक्यातील शेतकरी कृषी विभागाच्या अनास्थेमुळे अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांनी रोप लागवडीची बिलं सादर करून महिना उलटला, तरीही अद्याप पैसे खात्यावर जमा झाले नाहीत. निधी उपलब्ध असूनही कृषी विभागाकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
यापूर्वी निधी उपलब्ध नसल्याने अनुदानाची रक्कम जमा झाली नव्हती. मात्र, निधी येऊन महिनाभरापेक्षा जास्त कालावधी झाला असूनही तालुका कृषी अधिकारी कार्यालय शेतकऱ्यांना केवळ उडवाउडवीची उत्तरे देत आहे.
पैसे जमा होण्यास होत असलेल्या विलंबाबद्दल कोणतीही ठोस माहिती दिली जात नाही. यामुळे शेतकरी वारंवार कार्यालयात जाऊनही रिकाम्या हाताने परत येत आहेत.
कृषी कार्यालयातील अंतर्गत अडचर्णीचे कारण पुढे करून शेतकऱ्यांची फिरवाफिरी केली जात असल्याचा आरोप आहे. या दिरंगाईमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. ज्या शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली आहे, अशा शेतकऱ्यांनाही बिलांची रक्कम दिली जात नसल्याची तक्रार आहे.