---Advertisement---
Jalgaon Rain Update : जळगाव जिल्ह्यात १५ दिवसांपासून जोरदार पाऊस होत असून, आगामी काही दिवस जिल्ह्यात अजून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आगामी तीन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यासाठी हवामान २ ते विभागाकडून ४ सप्टेंबरदरम्यान ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
जिल्ह्यात केवळ जोरदार पाऊसच नाही, तर या दरम्यान ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे ऐन काढणीवर असलेल्या उडीद, मूग या पिकांना मोठा फटका बसण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.
उत्तर महाराष्ट्रालगत कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत असून, यामुळे आगामी तीन दिवस जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यासह खान्देशातील धुळे व नंदुरबार जिल्ह्यात देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत २२ टक्के पाऊस झाला आहे. तसेच जिल्ह्यातील लहान-मोठ्या प्रकल्पांमधीलही जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यात आगामी काही दिवस जोरदार पाऊस झाल्यास, जिल्ह्यातील अनेक धरणे ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या रब्बी हंगामातील पाण्याची चिंता मिटली असली तरी आगामी काही दिवसाच्या पावसामुळे खरीप पिकांना मात्र धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.