भडगाव-वाडे बससह इतर बस फेऱ्या नियमित करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा

---Advertisement---

 

भडगाव : वाडे गावात येणारी मुक्कामी बस तसेच इतर बस फेऱ्यांमध्ये अनियमियतता दिसून येत आहे. या बसफेऱ्या मनमानी पद्धतीने अचानक केव्हाही बंद करण्यात येत असतात. यामुळे प्रवाशी, विद्यार्थी व जेष्ठ मंडळींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. भडगाव ते वाडे मुक्कामी बस सध्यस्थितीत बंद आहे. ती पुन्हा सुरु करण्यात यावी तसेच इतर बससेवा नियमितपणे सुरळीत करण्यात यावी अन्यथा मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अशोक परदेशी यांनी दिला आहे. त्यांनी यासंदर्भातील निवेदन भडगाव बसस्थानकाची वाहतूक निरीक्षक व पाचोरा आगार प्रमुखांना शुक्रवारी (५ सप्टेंबर) दिले आहे.

निवेदनाचा आशय असा आहे कि, भडगाव ते वाडे ही मुक्कामाची बस पोळा यात्रेनंतर जवळपास १० ते १२ दिवसापासुन अचानक बंद करण्यात आली आहे. त्यासंदर्भात तक्रार केली असता ही मुक्कामे बस गुरुवारी ( ४ सप्टेंबर) रोजी पाठविण्यात आलेली होती. ही मुक्कामे बस नियमित सुरु ठेवावी, अशी मागणी आहे. तसेच शुक्रवारी (५ सप्टेंबर) रोजी भडगावहुन वाडे येथे सुटणारी सकाळची ८.३० वाजेची बसही अचानक बंद करण्यात आली. शाळेला सुटी असल्याने ही बस बंद केल्याचे एसटी महामंडळाकडुन सांगण्यात आले. मात्र भडगाव बसस्थानकावर वाडे मार्गाने जाणारे बरेच प्रवाशी थांबलेले होते. वाडे गावासह इतर गावांचे प्रवाशीही गावांमध्ये बसची वाट पाहत बसलेले होते. परंतु, अचानक ही बस बंद केल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागल्याचे चित्र दिसून आले. तसेच वाडे मुक्कामे बस बंद असल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले.

बस फेऱ्या अचानक बंद केल्यामुळे वाडे, टेकवाडे बुद्रुक, नावरे, बांबरुड प्र. ब, दलवाडे, गोंडगाव, सावदे, घुसर्डी, लोणपिराचे, बोरनार, कनाशी, देव्हारी, बोदर्डे, कोठली, वढधे,भडगाव या सर्व गावांच्या प्रवाशी, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक यांचे प्रवासासाठी अतोनात हाल होत आहेत. प्रवाशांना बस सेवे अभावी प्रवासाला मुकावे लागत आहे.

दुसरीकडे एसटी महामंडळाचे उत्पन्न बुडत आहे. बस फेऱ्या रद्द झाल्याने खाजगी प्रवाशी वाहतुकीला वाव मिळत आहे. सर्व बस फेऱ्या ह्या भडगाव तालुक्यात पाचोरा आगारातून सोडण्यात येतात. मात्र, वाडे गावासह इतर गावांच्याही बस फेऱ्या अचानक का बंद करण्यात येतात ? असा प्रश्न प्रवाशी उपस्थित करीत असून पाचोरा आगाराचा मनमानी कारभार वाढल्याचा आरोप करण्यात येत आहे. वरीष्ठांमार्फत याचीही चौकशी करण्यात यावी. भडगाव ते वाडे मुक्कामी बस नियमित सुरु ठेवावी. इतरही बस फेऱ्या नियमित व सुरळीत सुरु ठेवाव्यात. अन्यथा प्रवाशी, विद्यार्थ्यांसह आंदोलन करण्यात येईल असा इशारा अशोकबापु परदेशी यांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---