---Advertisement---
Gold Rate : सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सोने आणि चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. आज, मंगळवारी २४ कॅरेट सोने १ हजार ३०० रुपयांनी वाढून ते १,१०,२९० रुपये प्रति १० ग्रॅम रुपयांवर पोहोचले आहे. दुसरीकडे चांदीच्या किमतीने नको तो विक्रम गाठला आहे. परिणामी ऐन सणासुदीत खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांवर डोक्याला हात मारण्याची वेळ आली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात, कमकुवत अमेरिकन रोजगार आकडेवारी आणि अमेरिकन फेडकडून दर कपातीची अपेक्षा यांच्यात सोने ३६५५.८३ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. म्हणजेच त्यात ०.५४ टक्क्यांची वाढ झाली आहे.
जळगाव सुवारपेठेत सोने १६०० रुपयांनी वाढून ते १०८५०० (जीएसटीसह १११७५५) रुपये तोळ्यावर पोहोचले आहे. हा सोन्याचा सर्वकालीन उच्चांकी दर ठरला असून, सोने गेल्या आठवड्यात १९०० रुपयांनी महागले आहे. तर चांदी १ लाख २५ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोने १,१०,४४० रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १,०१,२५० रुपये आहे. आर्थिक राजधानी मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता येथे २४ कॅरेट सोने १,१०,२९० रुपये आणि २२ कॅरेट सोने १,०१,१०० रुपये प्रति १० ग्रॅम दराने आहे.
जयपूर, अहमदाबाद आणि पटना येथे २४ कॅरेट सोने १,१०,३४० रुपये आणि २२ कॅरेट सोने १,०१,१५० रुपये प्रति १० ग्रॅम दराने आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की २४ कॅरेट सोने सहसा गुंतवणूकीसाठी खरेदी केले जाते, तर २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोने दागिने बनवण्यासाठी खरेदी केले जाते.