---Advertisement---
नेपाळमध्ये जेन झेड आंदोलकांच्या नेतृत्वाखालील निदर्शने करण्यात येत आहेत. यामुळे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना आंदोलकांना चर्चेसाठी आमंत्रित करावे लागले. फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि यूट्यूब सारख्या २६ सोशल मीडिया साइट्सवरील बंदीविरोधात आंदोलन करणारे निदर्शक सोमवारपासून रस्त्यावर उतरले आहेत.
सरकारने सोशल मीडियावर बंदी घालण्याचे आदेश सोमवारी रात्री मागे घेतले आहेत. परंतु, अद्यापही आंदोलकांनी मागे हटण्यास नकार दिला आहे. या आंदोलकांनी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांचे काठमांडू येथील खाजगी निवासस्थान जाळल्याचे वृत्त आहे. मंगळवारी रात्री, संतप्त निदर्शकांनी माहिती आणि दळणवळण मंत्री तथा सरकारचे मुख्य प्रवक्ते यांचे खाजगी निवास्थानाची जाळपोळ केली आहे.
गृहमंत्र्यांनी सोमवारच्या हिंसक संघर्षांना प्रशासनाने दडपशाही पद्धतीने हाताळल्याचा आरोप करुन राजीनामा दिला आहे. दुसऱ्याच दिवशी नेपाळचे कृषी मंत्री रामनाथ अधिकारी यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
सोमवारी निदर्शने आणि पोलिसांशी झालेल्या हिंसक झटापटीत १९ जणांचा आपले प्राण गमवावे लागले आहेत. जवळपास ३०० जण जखमी झाले आहेत. यापार्श्वभूमीवर नेपाळ संसदेबाहेर कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. राजधानीतील डझनभर ठिकाणी अशांतता पसरत आहे, ज्यामुळे जनतेचा रोष आणि सरकारच्या निर्णयाविरुद्ध राग दिसून येत आहे.
मंगळवारी नवीन बाणेश्वर आणि काठमांडू खोऱ्यातील इतर भागात लोकांनी निदर्शने सुरू ठेवली. तणावपूर्ण परिस्थितीमुळे काठमांडूमधील संचारबंदी उठवल्यानंतर काही तासांतच पुन्हा लागू करण्यात आली.