---Advertisement---
जळगाव : गेल्या काही दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर आता ब्रेक घेतला आहे. दरम्यान, दोन दिवसांनंतर पुन्हा वीज आणि ढगांच्या गडगडाटांसह दमदार पावसाचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे.
जिल्ह्यात तीन दिवसांपासून ढगाळ परंतु कोरडे हवामान आहे. गेल्या दहा-बारा दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतशिवारात पाणी साचले असून जिल्हा परिसरात नदी नाले प्रवाहीत झाले आहेत.
बहुतांश ठिकाणी लहान मोठे प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. काही ठिकाणी नद्यांना पूर आले असून मध्यम प्रकल्पांचे आठ ते दहा दरवाजे उघडून नदीपात्रात विसर्ग केला जात आहे. सद्यस्थितीत तापमान २९ ते ३० अंशादरम्यान असून हवेतील आर्द्रता ७५ ते ८० टक्केदरम्यान आहे.
दरम्यान, आगामी दोन दिवस ढगाळ तर काही अंशी निरभ्र राहण्याचे संकेत असून गुरूवारनंतर राज्यासह जळगाव जिल्ह्यात पुन्हा पावसाच्या दमदार आगमनाचे संकेत भारतीय हवामान खात्याने दिले आहेत.