---Advertisement---
नंदुरबार : शहरातील अंधारे चौकात मोबाइलवर ठेवलेल्या स्टेटसचा वाद चिघळून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना ७ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी दोन्ही गटांकडून परस्परविरोधी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील संदीप वंजी माळी याने मोबाइलवर ‘गाड्याखाली कुत्रा चालतो, तर त्याला वाटते गाडा मीच ओढतो’ अशी म्हण असलेले स्टेटस ठेवले होते. यावरून ७ सप्टेंबर रोजी दीपक उर्फ बबलू बुधा माळी याने संदीप माळी याला विचारणा केली होती. यातून दोघांमध्ये भांडण झाले.
दरम्यान, अंधारे स्टॉपजवळील राममंदिराशेजारी हा वाद वाढत गेला. वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊन संदीप माळी व दीपक माळी यांच्यासोबत असलेले एकमेकांसोबत भिडले.
सोशल मिडियातील स्टेटसवरुन झालेल्या हाणामारीत जयेश दिलीप माळी याने धारदार शस्त्राने संदीप याच्या डोळ्यावर वार करून जखमी केले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. हाणामारीत संदीप याच्यासह त्याचे दोन्ही भाऊ जखमी झाले असल्याची माहिती देण्यात आली.
धारदार शस्त्राने वार
मारहाणीच्या दरम्यान संदीप माळी याच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट गहाळ झाले. दोन्ही गटांत तुंबळ हाणामारीनंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी संदीप माळी याने प्रथम दिलेल्या फिर्यादीवरून दीपक ऊर्फ बबलू माळी (२५), सचिन दिलीप माळी (२८), अनिल बुधा माळी (२७), जयेश दिलीप माळी (२५), राकेश रमेश माळी (२९) सर्व रा. माळीवाडा, यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.
दुसरी फिर्याद अनिल बुधा माळी याने दिली आहे. यानुसार, संदीप वंजी माळी (२५), चेतन वंजी माळी (२८), योगेश वंजी माळी (३०) तिघे रा. गोल्डनसिटी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.