---Advertisement---
जामनेर : तालुक्यात सेवा पंधरवडा अनुषंगाने “शाळा तेथे दाखला” या विशेष उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत जामनेर तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच गटशिक्षण अधिकारी जामनेर यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत एकूण २३४ सदस्यांनी सहभाग नोंदविला.
बैठकीत दाखले वाटपासंबंधीचे कामकाज पारदर्शक, जलद आणि सुलभ पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सविस्तर सूचना देण्यात आल्या. शैक्षणिक वर्षात कोणत्याही विद्यार्थ्याला दाखल्याविना अडचण येऊ नये यावर विशेष भर देण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शालेय व महाविद्यालयीन दाखले वेळेवर उपलब्ध होऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लागणार असल्याचे जामनेर तहसिलदार श्री. आगळे यांनी सांगितले.
शैक्षणिक वर्षात दाखले वेळेवर न मिळाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा तेथे दाखला हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सेवा पंधरवडा अंतर्गत ‘शाळा तेथे दाखला’ उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या सेवा पंढरवाड्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर दाखला उपलब्ध होणार आहेत. या पंधरवड्यात कोणत्याही विद्यार्थ्याला प्रमाणपत्राशिवाय सामोरे जावे लागू नये यासाठी विशेष भर देण्यात आली आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयाचे प्रमाणपत्र वेळेवर उपलब्ध होतील आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.









