---Advertisement---
धुळे : मागील महिन्यात जळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील एका लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली होती. यानंतर धुळे महापालिकेतील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. कर्मचाऱ्यांची हजेरी पाठवून पगार काढून देण्यासाठी लाच मागणाऱ्या मुकादमाला अटक करण्यात आली आहे. रविंद्र शामराव धुमाळ असे या लाचखोर मुकादमाचे नाव आहे. त्याला सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील भ्रष्टाचार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
तक्रारदार हे धुळे महापालिकेच्या आरोग्य विभागात सफाई कर्मचारी म्हणून काम बघतात. धुमाळ याची सफाई कर्मचाऱ्यांवर देखरेख करण्यासाठी मुकादम म्हणून नेमण्यात आले आहे. हजेरी पत्रक स्वच्छता निरीक्षकांकडे पाठवून पगार काढण्याचे काम धुमाळ करत होते. तक्रारदारांनी सांगितले की, धुमाळ यांनी त्यांच्या हजेरी पत्रकावर सही करूनच त्यांचा पगार काढून दिला असून पुढील महिन्याची हजेरी लावण्यासाठी ८ हजार रुपये लाच मागितली. तक्रारदारांनी याबाबत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्याकडे तक्रार केली.
पडताळणी दरम्यान धुमाळ यांनी ७ हजार रुपयांवर तडजोड करून लाच स्वीकारण्यास तयार झाल्यानंतर सापळ रचण्यात आला. अखेर कारवाई दरम्यान धुमाळ यांनी लाचेची रक्कम स्वीकारली आणि त्यांना रंगेहात पकडण्यात आले. धुळे महापालिकेच्या आरोग्य विभागात हजेरी बुकातील गैरप्रकार, कचरा ठेक्यातील भ्रष्टाचार यासारख्या तक्रारी यापूर्वीही अनेकदा झाल्या आहेत. मात्र ठोस कारवाई झाली नव्हती. या कारवाईनंतर आयुक्त अमिता दगडे-पाटील आता कोणती पावले उचलतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.