शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू , आदिवासी संघटनेकडून चौकशीची मागणी

---Advertisement---

 

शहादा : भारतीय स्वाभिमानी संघ आणि इतर आदिवासी संघटनांनी नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. बायलीबाई रेवजी वळवी (रा. अक्राणी, ता. तळोदा, जि. नंदुरबार) या गर्भवती महिलेच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी एका निवेदनातून केली आहे.

संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट २०२५ रोजी बायलीबाई वळवी यांना प्रसूतीसाठी नंदुरबारच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या स्वतः रुग्णवाहिकेतून उतरून स्ट्रेचरवर बसल्या आणि चालत प्रसूती विभागात गेल्या होत्या. मात्र, दीड तासांनंतर महिला तज्ञ डॉ. मोहित अग्रवाल यांनी त्या महिलेला मृत घोषित केले.

या घटनेवर संशय व्यक्त करत भारतीय स्वाभिमानी संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी यांनी म्हटले आहे की, जर बायलीबाई वळवी यांचा आधीच मृत्यू झाला होता, तर त्यांना प्रसूती विभागात का दाखल केले गेले? रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच हा दुहेरी मृत्यू घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ही घटना कैद झाली असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

या प्रकरणात डॉ. मोहित अग्रवाल, अधीक्षक डॉ. मिलिंद पाटील आणि इतर संबंधित कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, मृत महिलेच्या कुटुंबाला शासकीय मदत देण्याची मागणीही करण्यात आली आहे.जर येत्या १५ दिवसांत या घटनेची योग्य चौकशी झाली नाही आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळाला नाही, तर विविध आदिवासी संघटना एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करतील, असा इशाराही या संघटनांनी दिला आहे. या निवेदनावर रोहिदास वळवी, रविंद्र वळवी, सुशिल पावरा, पंकज वळवी, राकेश वळवी आणि अजय वळवी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---