---Advertisement---
भुसावळ : वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने तेच पाणी वाघूर नदीवर सुनसगाव-नशिराबाद दरम्यान पोहोचले. तेव्हा पुलावरून पाणी जात आहे. परिणामी या गावांचा संपर्क तुटला आहे.
भुसावळ तालुक्यातील वराडसीम-वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढल्याने धरण 100 टक्के भरले. यामुळे 16 रोजी सकाळी 8 वाजता धरणाचे 2 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले. त्यानंतर 10 वाजता 6 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले. असे दुपारी 1 वाजे दरम्यान 20 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आल्याने वाघूर नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
परिणामी सुनसगाव नजिक वाघूर नदीवर नशिराबाद-सुनसगाव दरम्यान बांधण्यात आलेला पूल पाण्याखाली गेल्याने या रस्त्यावरुन वाहतूक बंद करण्यात आली होती. पुलावरुन पाणी गेल्याने नशिराबाद-सुनसगाव या गावांचा संपर्क तुटला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कुऱ्हा पानाचे येथूनच भुसावळ मार्गे वळविण्यात आली.
पुलावरुन पाणी जाताच सुनसगाव पोलीस पाटील खुशाल पाटील व सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र काटे यांनी महसूल व पोलीस प्रशासनाला माहिती दिली. त्यामुळे नशिराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, सर्कल, तलाठी तसेच भुसावळ तालुका पोलीस अधिकारी, तलाठी, ग्रामपंचायत अधिकारी, पदाधिकारी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष प्रवीण चौधरी यांनी घटनास्थळी दाखल होऊन पर्यायी व्यवस्था केली.
याच पुलाजवळ सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे गावाकडे पाणी येते की काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. गेल्या चार वर्षानंतर पुन्हा एकदा या पुलावरुन पाणी गेल्याने पूर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गद केली होती. आता पाणी ओसरल्यावर पुलाची साफसफाई करावी लागेल. त्यानंतरच वाहतूक सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे.