---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यातील जामनेर, मुक्ताईनगर आणि पाचोरा तालुक्यांमध्ये १५ आणि १६ सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणावर झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे, घरांचे तसेच जनावरांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने बचाव व मदतकार्य सुरू केले आहे. बाधित नागरिकांसाठी शाळांमध्ये निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नागरिकांना घाबरून न जाता दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे ३५ अधिकारी व जवान यांचे पथक मागवले आहे. यात एक पथक जामनेर येथे दुसरे पथक पाचोरा येथे रवाना करण्यात आले आहे.
अफवांवर विश्वास ठेऊ नका : पालकमंत्री
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, प्रशासन तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. प्रत्येक बाधित कुटुंबापर्यंत मदतीचा हात पोहोचवला जाईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. नदी-नाल्याजवळ जाणे टाळावे तसेच गुरेढोरे, शेतीसाहित्य सुरक्षित स्थळी हलवावे. प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवा आणि संयम बाळगा.
नेरी येथे ४० घरांमध्ये शिरले पाणी
जामनेर येथील नेरी, जामनेर, वाकडी, शेंदुर्णी आणि तोंडापूर या गावाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. मौजे नेरी बु. येथे २१ ते ४० घरांमध्ये पाणी शिरले असून पशुधनाचे नुकसान झाले आहे. नेरी दिगर येथे १५ ते २० घरांमध्ये व ५ दुकानांमध्ये पाणी साचले असून एक कुटुंब शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. माळपिंप्री येथे पिकांचे मोठे नुकसान झाले असून सुनसगाव खुर्द व सुनसगाव बु. या गावांचा संपर्क तुटला आहे.
पाचोरा तालुक्यात ७ गावांमध्ये पूर
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव व बरखेडी या दोन मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. शिंदाड, गहुले, वडगाव कडे, सातगाव डोंगरी, वाडी, शेवाळे व वाणेगाव या ६ ते ७ गावांमध्ये नदी-नाल्यांना पूर आला आहे. साधारणतः ३५० ते ४०० कुटुंबांना सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. मौजे शिंदाड येथे तब्बल ४०० जनावरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
काकोड येथे पुराच्या पाण्यात तरुण वाहून गेला
मुक्ताईनगर तालुक्यातील कुन्हा व जोधनखेडा गावात घरांमध्ये पाणी शिरले असून पूरपरिस्थिती आहे. काकोडा गावातील किरण मधुकर सावळे वय 28 हे दुर्दैवाने पुराच्या पाण्यात वाहून गेले. संबंधीत तालुक्यांचे प्रांताधिकारी, तहसीलदार, महसूल व कृषी खात्याचे अधिकारी नुकसानीची पाहणी करून पंचनामे करत आहेत. बाधित कुटुंबांसाठी तातडीने अन्न, पिण्याचे पाणी व बिछायतची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने सांगितले की, आपत्तीग्रस्तांना शासनाकडून मदत व नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी शांतता व संयम बाळगून प्रशासनाशी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांसह, जिल्हा प्रशासनाने केले आहे.