धनगर समाजाचे मुक्ताईनगरात धरणे आंदोलन; १५ दिवसांत निर्णय न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा, काय आहे मागणी?

---Advertisement---

 

मुक्ताईनगर : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी जय मल्हार सेनेच्या वतीने आज मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान प्रशासनाला निवेदन सादर करून, समाजावरील अन्यायाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी १५ दिवसांत निर्णय न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

मागण्यांमध्ये प्रमुखत्वाने मेंढपाळांच्या वाड्यांवर होत असलेले दरोडे, मेंढ्या चोरीचे वाढते प्रकार, महिलांवरील अत्याचार, बंदुकीचा परवाना, तसेच धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करून आरक्षण लागू करण्याची मागणी यांचा समावेश आहे.

जय मल्हार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून जळगाव जिल्ह्यात मेंढपाळांच्या वाड्यांवर दरोडे टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. महिलांच्या अब्रूवर आघात होत असून, पोलिस कारवाईत निष्काळजीपणा दिसून येतो आहे. त्यामुळे संबंधित गुन्ह्यांमध्ये दरोड्याचा कलम लावून आरोपींना तात्काळ अटक करावी.”

आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याचे आश्वासन भाजपने निवडणुकीपूर्वी दिले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कृती न झाल्यामुळे समाजात तीव्र नाराजी आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण लागू करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र हजारो कॅबिनेट मीटिंग झाल्या तरी निर्णय झालेला नाही. ही समाजाची फसवणूक आहे,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

बंदुकीचा परवाना देण्याची मागणी

मेंढपाळांच्या सुरक्षेसाठी बंदुकीचा परवाना देण्यात यावा, ही मागणीही या आंदोलनात ठासून मांडण्यात आली. “दरोडेखोरांपासून स्वसंरक्षणासाठी बंदुकीचा परवाना आवश्यक आहे. ही आमची अनेक वर्षांची मागणी आहे,” असे आंदोलकांनी सांगितले.

राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

प्रशासनाने १५ दिवसात मागण्यांवर ठोस कारवाई न केल्यास, राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची जबाबदारी शासनावर राहील, असा इशारा जय मल्हार सेनेच्या वतीने देण्यात आला. आंदोलन स्थळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन समाज बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी आंदोलनाप्रसंगी जय मल्हार सेना राष्ट्रीय अध्यक्ष लहुजी शेवाळे, जय मल्हार सेना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रवी पवार, जय मल्हार मेंढपाळ सेना जिल्हाध्यक्ष मिठाराम ठेलारी, विजय सावळे, दीपक चिंचोले, सचिन धनगर, जितेंद्र जुमळे नरेंद्र पवार सिताराम बिचकुले व आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---