---Advertisement---
जामनेर : किरकोळ भांडणातून पतीने पत्नीवर चाकूने वार करीत तीचा खून केला. मिराबाई बाळू मोरे (वय ४२) असे मयत महिलेचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मुंदखेडा गावात घडली. या घटनेनंतर काही तासात संशयित बाळू विश्वनाथ मोरे याला अटक करण्यात आली आहे.
जामनेर तालुक्यातील मुंदखेडा येथे बाळू विश्वनाथ मोरे हे वास्तव्यास असून मोलमजूरी करुन ते कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. गुरुवारी दुपारच्या सुमारास बाळू मोरे यांचेपत्नी मिराबाई यांच्यासोबत भांडण झाले. त्यानंतर मुंदखेडा गावातील मराठी शाळेसमोरील पिरो बाबा मंदिराजवळ बाळू मोरे यांनी पत्नी मिराबाई यांच्यावर चाकूने सपासप वार केले.
यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मिराबाई या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले.
तपासचक्रे फिरवित केली अटक
बाळूने मिराबाईचा खून कोणत्या कारणामुळे केला ते अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी अरूण आव्हाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून घटनेची माहिती जाणून घेतली आहे. मृत महिलेचा पती बाळू हा घटनास्थळावरून पसार झाला होता. परंतु, पोलीसांनी आपली तपासचक्रे फिरवित संशयित बाळू मोरे यांना ताब्यात घेतले. जामनेर पोलिसात गुन्हा दाखल
याप्रकरणी देविदास रायभान भिल यांच्या फिर्यादीवरून बाळू विश्वनाथ मोरे (वय ५०) यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील करीत आहेत.