---Advertisement---
पाचोरा : जळगाव जिल्हात ढग फुटी सदृश्य पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. यात शेतीचे नुकसानासोबतच गुरे ढोरांची हानी झाली आहे. तर काही गावांमध्ये घरांची देखील पडझळ झाली आहे. अशातच पाचोरा तालुक्यातून एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे. यात १६ वर्षीय मुलगी हिवरा नदीच्या पुरात वाहून गेली. आपली नात पुरात वाहून गेल्याचे कळताच तिच्या आजोबांनी देखील प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
ढगफुटीमुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात नागरिकांचे घरे , गुरे तसेच शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात झाल्याचे समोर आहेत. यातच पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक परिसरात हिवरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. याच गावातील महिलेचा व तिच्या सोबत असलेल्या सुमारे 16 वर्षीय मुलीचा शेतातून येत असताना नदीपात्रात पाय घसरला, सुदैवाने महिलेस वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले.
मात्र, निकिता पाण्यात वाहून गेली, निकिताला शोधण्याचे काम युद्ध पातळीवर ग्रामस्थ करीत आहेत. तरी दुपारी अडीच वाजेपर्यंत कोणतीही शासकीय मदत यंत्रणा घटनेस्थळावर पोहोचली नाही. तालुक्यात पूरस्थिती निर्माण झालेली असताना अशा कठीण प्रसंगीही संबंधित यंत्रणा सज्ज नसल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे,तब्बल दोन अडीच तासांनी पोलीस प्रशासन, नगर पालिका, तलाठी मंडळ अधिकारी सर्व घटनास्थळी दाखल झाले. मिळेल त्या उपयोजनाचा वापर करून निकिताला शोधण्याचे काम सुरू आहे. दरम्यान या घटनेची माहिती आजोबांना मिळताच त्यांनी या धसक्याने प्राण सोडल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. मुलीचे नाव निकिता भालेराव (वय-१६) व आजोबाचे शामराव खैरे (वय-६५) असे आहे.