---Advertisement---
चेतन साखरे जळगाव : जळगावच्या राजकारणात शुक्रवारी सेवा पंधरवडाच्या निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाल व मापाडींना रूमाल वितरणाच्या निमित्ताने नव्या अध्यायाला सुरूवात झाली. विधानसभा निवडणुकीत एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी राहिलेले डॉ. सुनील महाजन आणि आमदार सुरेश भोळे यांच्यातील राजकीय वादावर सोनेरी शालीचे पांघरूण पडले आहे.
राजकारणात ‘फार काळ कुणी कुणाचा शत्रु किंवा मित्र नसतो’ या म्हणीचा सध्या सोयीस्कर वापर होतांना सर्रासपणे दिसत आहे. राजकारणात आज वैरी असलेले उद्या मित्र आणि आज मित्र असलेले उद्याचे वैरी होतांना सर्वसामान्य जनता पाहत आली आहे. जळगाव जिल्ह्यात मोठी राजकीय संघर्षाची परंपरा राहिली आहे. हा राजकीय संघर्ष जिल्ह्याने चांगलाच अनुभवला देखिल आहे.
गेल्या दशकापासून जळगाववासियांनी आमदार सुरेश भोळे आणि डॉ. सुनील महाजन यांच्यातील कट्टर राजकीय वैराचाही असाच काहीसा अनुभव घेतला आहे. आमदार सुरेश भोळे आणि डॉ. सुनील महाजन हे समाजबांधव असले तरी त्यांच्यातील राजकीय स्पर्धा आणि टोकाचे विरोध हे नेहमीच चर्चेत राहिले. आ. भोळे आणि डॉ. महाजन यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोपही केले. नुकतेच महापालिकेच्या जुन्या भंगार पाईप चोरी प्रकरणातही माजी महापौरांचे पती असलेले डॉ. सुनील महाजन यांच्यावर पोलिसात गुन्हा
दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या चौकशीसाठी भाजपाचे आमदार सुरेश भोळे यांनी थेट विधानसभेत आवाज उठविला होता. राजकारणातून एकमेकांना उठविण्यासाठी जेजे शक्य होईल तेते सर्व प्रयत्न या दोन्ही नेत्यांनी केल्याचे जळगावकरांनी पाहिले आहे.
भाजपाशी साधली जवळीक
डॉ. सुनील महाजन यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निमित्ताने ठाकरे गटाला सोडून भाजपाशी जवळीक साधत सभापतीपद पदरात ज पाडून घेतले. पद मिळाल्यानंतर डॉ. सुनील महाजन यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, स जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आभारही घ मानले होते. दरम्यान डॉ. सुनील महाजन यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा सुरू होताच, आ. भोळेनी ह या प्रवेशाविषयी जाहीरपणे तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
नव्या राजकीय मैत्रीचा पंधरवडा
सेवा पंधरवडाच्या निमित्ताने आ. सुरेश भोळे यांना सभापती डॉ. सुनील महाजन यांनी रूमाल वितरणाच्या कार्यक्रमाला निमंत्रीत करून नव्या राजकीय मैत्रीचा पंधरवडा सुरू केला. बाजार समितीत आ. भोळे यांचे डॉ. सुनील महाजनांकडून ढोल-ताशांच्या गजरात, फुलांच्या प्रचंड वर्षावात आणि फटाक्यांच्या आतषबाजित जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी सभापती डॉ. सुनील महाजन यांनी आ. भोळे यांच्या गळ्यात सोनेरी शाल घालून राजकीय वादावर पांघरूण घातल्याची राजकीय वर्तुळात होती.
विधानसभा निवडणुकीतही दोन हात
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून डॉ. सुनील महाजन यांच्या पत्नी तथा माजी महापौर जयश्री महाजन आणि भाजपाकडून आमदार सुरेश भोळे यांच्यात सरळ लढत झाली होती. विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान दोन्ही बाजूकडून आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडल्या होत्या. अगदी वरीष्ठ नेत्यांवर टीकेची झोड उठविण्यात आली होती. मात्र आ. भोळे यांनी जयश्री महाजन यांचा दणदणीत पराभव केला.