---Advertisement---
मुंबई : राज्याच्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच आठ हजार नव्या बस दाखल होणार आहेत. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ विचारात घेता एसटीत चालक व सहाय्यकाची १७ हजार ४५० पदे कंत्राटी तत्त्वावर भरली जाणार आहेत. या पदासाठी किमान मासिक वेतन हे ३० हजार रुपये असणार आहे.
राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी राज्यातील तरुणांना आवाहन केले आहे
की, या नोकरभरतीचा त्यांनी लाभ घ्यावा. या भरतीतून हजारो तरुणांना रोजगाराची संधी चालून आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या ३००व्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार चालक व सहाय्यक या पदावर तीन वर्षांसाठी कंत्राटी तत्त्वावर भरती केली जाणार आहे. त्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.
ही प्रक्रिया २ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ही प्रक्रिया सहा प्रादेशिक विभागांमध्ये राबवली जाईल. त्यानंतर संबंधित संस्थेकडून एसटी महामंडळाला आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. या कर्मचाऱ्यांना एसटीकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यांना सुमारे ३० हजार रुपये पगार मिळेल. एसटीला आवश्यक त्या बसगाड्या आणि त्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतर प्रवाशांना अखंड, दर्जेदार व सुरक्षित बससेवा दिली जाईल, अशी ग्वाही परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली.