---Advertisement---
एरंडोल : तालुक्यात सोमवारी (२२ सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास सर्वत्र ढगसदृश पाउस झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अंजनी नदीला आलेल्या पुरामुळे कासोदा व म्हसावद रस्त्यावरील पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती.अंजनी नदीच्या पुराचे पाणी शहरातील आठवडे बाजार परिसरात तसेच गांधीपुरा भागातील फकीरवाडा परिसरात शिरल्यामुळे व्यावसायिकांचे तसेच घरातील संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
दरम्यान आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन,खासदार स्मिता वाघ, आमदार अमोल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी फकीरवाडा येथे भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तालुक्यात मालखेडे येथे दोन म्हशींचा मृत्यू झाला तर १५१ घरांचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली.कासोदा, उत्राण व भालगाव मंडळातील सुमारे तीस ते पस्तीस गावात पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.
एरंडोल तालुक्यातील कासोदा, उत्राण व भालगाव शिवारातील सुमारे तीस ते पस्तीस गावात पहाटे पहाटे तीन ते चार वाजेच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाउस झाल्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला. सुमारे तीस ते चाळीस वर्षानंतर असा पाउस झाल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. उत्राण, निपाने, भातखेडे, आडगाव, मालखेडे यासह अनेक गावात पुराचे पाणी शिरल्यामुळे गावात चार ते पाच फुट पाणी वाहत होते. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पिके वाहून गेले आहेत.
मालखेडे येथे दोन म्हशी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या तर तालुक्यात सुमारे दीडशे घरांचे नुकसान नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतांमध्ये पाणी तुंबल्यामुळे तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार अमोल पाटील यांनी प्रशासनाला दिले.
तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टी झाल्यामुळे अंजनी प्रकल्पातील पाण्याची आवक वाढल्यामुळे प्रकल्पाचे तीनही दरवाजे सुमारे चाळीस सेंटीमीटरने उघडण्यात येवून सुमारे सहा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे अंजनी नदीला पावसाळ्यातील पहिलाच मोठा पूर आला. नदीच्या पुराचे पाणी आठवडे बाजारात तसेच गांधीपुरा भागातील दुकानात व घरात शिरल्यामुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
गांधीपुरा भागातील फकीरवाड्यात पुराच्या पाण्यात तीस ते पस्तीस कुटुंब अडकले होते. एन.डी.आर.एफ.च्या जवानांनी त्यांची सुटका केली. सोनबर्डी येथेही पुरात अडकलेल्या ग्रामस्थांची सुटका करून त्यांची आश्रमशाळेत निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. अंजनी नदीला आलेल्या पुरामुळे कासोदा व म्हसावद रस्त्यावरील पुलांवर पाणी आल्यामुळे या दोन्ही मार्गावरील वाहतूक रात्री उशिरापर्यंत ठप्प झाली होती. पोलीस, गृहरक्षक दलाचे जवान, पालिका कर्मचारी व मुख्याधिकारी अमोल बागुल पुलाच्या दोन्ही बाजूस थांबून नागरिकांना पुलावर जाण्यापासून रोखत होते तसेच मदत करत होते.
मरीमाता चौकातील डी.पी.पाण्याखाली आल्यामुळे शहरातील काही भागातील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.
२)अंजनी नदीच्या पुलावरून वाहणारे पाणी.
---Advertisement---